रत्नागिरी : रायगड जिल्ह्यातील रेवस येथून सुरू होऊन रत्नागिरीच्या सागरी किनाऱ्यावरून थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आरोंदापर्यंत जाणाऱ्या ५७० किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्गाचे काम अद्यापही रखडले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गाचे काम सुरू आहे. त्यानंतर नव्याने या मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी महामार्ग विकास आराखडा बनविण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू आहे. वर्षभराचा कालावधी उलटूनही याबाबतचा विकास आराखडा तयार झालेला नसल्याने हे काम रखडले आहे.सागरातून बंदराबंदरांमध्ये होणारी जलवाहतूक बंद झाल्यानंतर किनारपट्टी भागातील विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. त्यामुळे सागरी भागातून महामार्गाची संकल्पना पुढे आली. मात्र, गेल्या १५ वर्षांच्या काळातही हा सागरी महामार्ग पूर्ण होऊ शकला नाही.
राज्य शासनाकडे त्यासाठी निधी नसल्याने हे काम रखडले, असे सांगितले जात आहे. आता हा सागरी महामार्ग केंद्र शासनाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला.
या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देतानाच ५७० किलोमीटरच्या या रस्त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोकणातील या मार्गाला महामार्गाचा दर्जा दिला आहे. तसेच १० हजार कोटी रुपयांची तरतूदही या कामासाठी करण्यात आली आहे.
या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यामुळे रस्ता रुंदीकरण आवश्यक ठरले आहे. त्यामुळेच रस्त्याची नव्याने उभारणी व रुंदीकरणासाठी महामार्ग विभागातर्फे या रस्त्याचा विकास आराखडा (डीपीआर) बनविण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.
विकास आराखडा बनविण्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सागरी महामार्ग हा किनारपट्टी भागासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. किनारपट्टी भागातील पर्यटन विस्तारही मोठ्या प्रमाणात होत असून, महामार्ग रुंदीकरणानंतर पर्यटनाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात १८ पूल उभारले जाणारकोकणच्या सागरी भागाच्या विकासासाठी वरदान ठरणाऱ्या ५७० किलोमीटर लांबीच्या महामार्गावर रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ४१ पूल उभारले जाणार आहेत. या मार्गावर एकूण ८२ पूल उभारावे लागणार आहेत. त्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० पूल, तर रत्नागिरी जिल्ह्यात १८ पूल उभारले जाणार आहेत. ठाणे विभागातही १३ पूल उभारले जाणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणेच सागरी महामार्ग विकासाला हातभार लावणारा ठरणार आहे.