रत्नागिरी : कोकण म्हाडाकडून जिल्ह्याच्या विविध भागात असलेल्या जागांमध्ये अडीच हजारपेक्षा अधिक घरे उभारून त्याची सोडत (लॉटरी) काढली जाणार आहे. यामध्ये पंतप्रधान आवास योजनेतील व म्हाडाच्या योजनेतील घरांचा समावेश राहणार असल्याची माहिती महाराष्ट गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी गुरूवारी येथे दिली.
रत्नागिरी जिल्हा दौºयात म्हाडाच्या जागा व पूर्ण झालेल्या प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सामंत पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्यासमवेत कोकण म्हाडाचे मुख्याधिकारी विजय लहाने उपस्थित होते. सामंत म्हणाले, जिल्ह्यात म्हाडाच्या घरांची अनेकांना आवश्यकता आहे. राज्यातही पंतप्रधान आवास योजनेची कार्यवाही सुरू असताना त्यामध्ये रत्नागिरी, वाशिम व नंदूरबार जिल्ह्यात त्या योजनेतून एकही घर लाभार्थींना देण्यात आलेले नाही. त्यामुळे म्हाडा राबवित असलेल्या नवीन प्रकल्पांमध्ये पंतप्रधान आवाससाठीची घरे व म्हाडाच्या योजनेतील घरांचा समावेश राहणार आहे.
चिपळूणमधील म्हाडाच्या मालकीच्या ११ एकर जागेतील घरांचा प्रकल्प १९८८ पासून प्रलंबित होता. या प्रकल्पाची पाहणी करून यातील ४० टक्के जागा मूळ मालकांना घरे उभारण्यासाठी भाडेपट्टातत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या जागेवर मूळ मालकांनी आपली घरे उभारावयाची आहेत. या ४० टक्के जागेतील काही जागा महामार्ग चौपदरीकरणात गेली आहे. त्याची जी नुकसानभरपाई असेल ती मूळ जागा मालकांच्या सोसायटीला दिली जाईल. या जागेतील ६० टक्के जागेवर म्हाडाकडून तीन टप्प्यात एकूण १५०० घरे उभारली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात यातील ५०० घरे उभारली जाणार असून, त्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होईल. त्यामध्ये २५० घरे म्हाडा योजनेतून, तर २५० घरे ही पंतप्रधान आवास योजनेतून लॉटरी पध्दतीने दिली जाणार आहेत.
उदय सामंत म्हणाले -- पंतप्रधान आवास योजनेचे २०२२पर्यंतचे जिल्ह्याचे उद्दिष्ट१००६१ घरांचे आहे. मात्र, जिल्ह्यात या योजनेतून एकही घर लाभार्थीला मिळालेले नाही. म्हाडाच्या मार्फत या योजनेतील १९०० घरे जिल्ह्यात होऊ शकतील. - नाचणे येथील ५ एकर जागा राज्य सरकारने शासकीय कर्मचारी वसाहतीसाठी दिली होती. त्या जागेत शासकीय कर्मचाºयांसाठी ३०० व जनतेसाठी ३०० अशी ६०० घरे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. - टीआरपीजवळ अतुलित बलधामजवळ ही जागा असून, त्याबाबतच्या प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. रत्नागिरीच्या झोपडपट्टीतील सुमारे ८०० घरांचे सर्वेक्षण करून तेथे म्हाडाची घरे उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास रत्नागिरी नगर परिषदेला सांगितले आहे.