रत्नागिरी : रत्नागिरी-नागपूर महामार्ग क्रमांक १६६च्या चौपदरीकरणासाठी आवश्यक जमिनीचे, मालमत्तांचे मूल्यांकन अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक बांधकामांची मूल्यांकने न झाल्याने महामार्गाचे काम रखडले आहे.त्यामुळे या महामार्ग चौपदरीकरणात ज्यांची घरे, मालमत्ता जात आहेत, त्यांना दुसरीकडे जागा घेऊन घर बांधणे अशक्य झाले आहे. निवाडे न झाल्याने या प्रकल्पग्रस्तांची आर्थिक कोंडी झाली असून, ही मूल्यांकने व निवाडे लवकर होऊन भरपाई तातडीने देण्याची मागणी भूधारकांमधून होत आहे.रत्नागिरी - नागपूर या महामार्ग चौपदरीकरणासाठी गेल्या ३ वर्षांपासून जमीन संपादनाचे, मालमत्ता मूल्यांकनाचे काम सुरू होते. यातील रत्नागिरी विभागातील मालमत्तांची मूल्यांकनेच रखडली आहेत. सुरुवातीला या मार्गासाठी जागा देण्यास कुवारबाव येथील व्यापारी व जमीनधारकांनी विरोध केला होता. तत्कालीन युती सरकार व केंद्रातील मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत हा विषय गेला होता.
या चौपदरीकरणात कुवारबाव बाजारपेठ पूर्णत: स्थलांतरीत करावी लागणार आहे. प्रथम विरोधानंतर कुवारबावमधील जमीनधारकांनी जमिनी देण्याचे मान्य केले. अन्य ठिकाणीही याप्रमाणेच जमीनधारकांनी सहकार्य केले. परंतु रत्नागिरी विभागातील मूल्यांकने रेंगाळल्याने या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला उशीर होत आहे.चौपदरीकरणात ज्यांची घरे जाणार आहेत, त्यांना नवीन घरासाठी जुन्या जागेवर, घरावर कर्जही मिळेनासे झाले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने या मालमत्ताधारकांची ही आर्थिक कोंडी फोडावी, अशी मागणी होत आहे. रत्नागिरी-नागपूर या महामार्गाची चार वर्षांपूर्वीच आखणी करण्यात आली आहे.
रत्नागिरी - कोल्हापूर-मिरज - सांगोला - मंगळवेढा -सोलापूर - तुळजापूर - लातूर - नांदेड - पुसद - यवतमाळ - नागपूर असा हा मार्ग आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा, विदर्भाला जोडणारा हा महामार्ग महत्त्वाचा मानला जातो. सातत्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळेच या महामार्गाचे चौपदरीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, रत्नागिरी बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे काम रेंगाळल्याने नाराजी व्यक्त होत आहे.रत्नागिरी विभागात १५३ मूल्यांकने शिल्लक असल्याचे या महामार्गाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले होते. त्यानंतर ४ सप्टेंबर २०१९ रोजी नाचणे, झाडगाव येथील एकुण २३ बांधकामांचे मूल्यांकन करण्यात आले. उर्वरित १३० बांधकामांचे मूल्यांकन झालेले नाही. यामध्ये कुवारबावमधील २३, पडवेवाडीतील ६, नाचणेतील ६०, झाडगावमधील २१ या बांधकामांचा समावेश आहे.
मूल्यांकनेच झालेली नसल्याने या बांधकामांची नुकसानभरपाई मालकांना मिळू शकलेली नाही. परिणामी अन्यत्र जागा घेऊन घर बांधणे अशक्य झाले आहे. याच महामार्गावरील नाणीजचा निवाडाही अद्याप रखडला असून मूल्यांकने लवकर करावीत, अशी मागणी होत आहे.मूल्यांकने न झाल्याने तीव्र नाराजीमुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र हे चौपदरीकरण काम रत्नागिरी विभागातच अपूर्ण आहे. रत्नागिरीला कोल्हापूर, नागपूरशी जोडणाऱ्या रत्नागिरी-नागपूर महामार्ग चौपदरीकरणाची प्रक्रियाही रत्नागिरी विभागातच अपूर्ण आहे. त्यामुळे हा योगायोग आहे की, दुर्लक्ष याबाबत आता चर्चेला उधाण आले आहे.