नाणारवरुन पुन्हा जुंपणार! प्रकल्प समिती आणि प्रकल्पग्रस्त आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 01:12 PM2019-02-05T13:12:18+5:302019-02-05T13:47:47+5:30
नाणार प्रकल्पाबाबतची उच्चस्तरीय समिती बेकायदेशीर आहे, असा आक्षेप खासदार विनायक राऊत यांनी समितीसमोरच नोंदवला घेतला.
रत्नागिरी - नाणार प्रकल्पाबाबतची उच्चस्तरीय समिती बेकायदेशीर आहे, असा आक्षेप खासदार विनायक राऊत यांनी समितीसमोरच नोंदवला घेतला. खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत यांच्यासह प्रकल्पविरोधी आंदोलकांची समिती प्रकल्पाच्या उच्चस्तरीय समितीसमोर आल्याने थोडासा गोंधळ निर्माण झाला. राजापूर तालुक्यातील नाणारसह 14 गावांमध्ये होत असलेल्या रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी उच्चस्तरीय सुकथनकर समिती रत्नागिरीत दाखल झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात कडेकोट पोलीस बंदोबस्तात समितीने आपले कामकाज सुरू केले.
राज्याचे माजी सचिव द. म. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत माजी वित्त आणि पेट्रोलियम सचिव डॉ. विजय केळकर, अभय पेठे, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांचा समावेश आहे. यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हेही उपस्थित आहेत. ग्रामस्थ समितीसमोर आपले म्हणणे, शंका मांडत आहेत. त्या ऐकून समिती आपल्या शिफारशी सरकारला सादर करणार आहेत. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास खासदार राऊत, आमदार साळवी, सामंत समितीसमोर आले आहेत. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले आहे.