रत्नागिरी : गणपतीपुळेत सरस प्रदर्शनाचे उद्घाटन, प्रदर्शन ३ जानेवारीपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:09 PM2018-12-31T13:09:18+5:302018-12-31T13:12:14+5:30
महिला बचत गटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळावे व उत्पादन विक्रीच्या वृध्दीसाठी बचत गटांनी गुणवत्तापूर्ण उत्पादनांची आकर्षक वेस्टनासह विक्री करावी, असे आवाहन गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे राज्यमंत्री व पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.
गणपतीपुळे : महिला बचत गटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळावे व उत्पादन विक्रीच्या वृध्दीसाठी बचत गटांनी गुणवत्तापूर्ण उत्पादनांची आकर्षक वेस्टनासह विक्री करावी, असे आवाहन गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे राज्यमंत्री व पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.
गणपतीपुळे येथे आयोजित सरस प्रदर्शन ३० डिसेंबरला सुरू झाले, ते ३ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरुपा साळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, शिल्पा सुर्वे, महिला व बालकल्याण सभापती साधना साळवी, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आरगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक पनवेलकर, जिल्हा विकास अधिकारी आरीफ शहा, गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश ठावरे, उपस्थित होते.
यावेळी तालुकास्तरावर प्रथम, द्वीतीय व तृतीय पारितोषिक देऊन जिल्ह्यातील ९ तालुक्यातील स्वयंसहाय्यता गटांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. पत्रकार राजेश जोष्टे यांना सर्वोत्कृष्ठ पत्रकार म्हणून गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट बँक शाखा व्यवस्थापक म्हणून स्टेट बँक आॅफ इंडिया, देवरुख शाखेचे अमोल शांडगे यांचाही गौरव करण्यात आला.
डि-मार्टशी संपर्क
मुख्यकार्यकारी अधिकारी आंचल गोयल यावेळी बोलताना म्हणाल्या की, सरस हे एक व्यासपीठ आहे. ग्राहकांबरोबर संवाद कौशल्य कसे करावे या बाबीही सरस प्रदर्शनातून समजाऊन घ्याव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ह्यडि मार्टह्णसारख्या मोठ्या संस्थांशी आम्ही संपर्क केला आहे. यामुळे वर्षभर महिला बचत गटांची उत्पादनांची विक्री होण्यास मदत होईल.