चिपळूण : चिपळूण येथील खेडेकर क्रीडा संकुलाबाहेरील मैदानात चिपळूण पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - उमेद अंतर्गत सभापती पूजा निकम यांच्या पुढाकाराने बचत गटांचा पापड महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला आहे. हा महोत्सव दोन दिवस सुरु राहणार आहे. या महोत्सवात तालुक्यातील ४० गावांतील ४८ बचत गट सहभागी झाले आहेत.
महिलांनी आजचा जागतिक महिला दिन केवळ एक दिवस साजरा न करता, वर्षाचे ३६५ दिवस साजरा करावा. स्त्री ही सोशिक नाही तर ती सजग राहावी, कर्तृत्ववान व्हावी, तिला तिच्या अधिकाराची जाणीव व्हावी यासाठी महिला दिन साजरा करावा, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे यांनी केले.या महोत्सवाचा शुभारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. जानवे व पोलीस निरीक्षक नीशा जाधव यांच्या हस्ते गुढी उभारुन तर रेणुका राजेशिर्के यांच्या हस्ते फित कापून झाला. मार्गताम्हाणे बचत गटाच्या स्नेहल चव्हाण यांनी श्रीफळ वाढवले.
या कार्यक्रमाला सभापती पूजा निकम, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी सभापती दीप्ती माटे, जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, माजी नगरसेविका सीमा चाळके, आदिती देशपांडे, स्मिता जानवलकर, पाणी सभापती वर्षा जागुष्टे, नगरसेविका फैरोजा मोडक, सफा गोठे, शिवानी पवार, अपर्णा बेलोसे उपस्थित होत्या.यावेळी सभापती निकम यांनी पापड महोत्सवाचा उद्देश सांगताना ग्रामीण भागातील महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी सहकार्य केल्याचे सांगितले.
उपविभागीय अधिकारी डॉ. जानवे पुढे म्हणाल्या की, महिलांमध्ये संघभावना आहे व तीच कुटुंबाला एकत्र ठेवते तरीही महिला सबलीकरणाची गरज आहे का? आज महिला सबलीकरणासाठी विविध चळवळी सुरु आहेत, अनेक कार्यक्रम घेतले जातात. याला आपणच कारणीभूत आहोत.
महिलांच्या हातात जशी पाळण्याची दोरी असते तशी संस्काराची शिदोरीही त्यांच्याच हातात आहे. आपल्या मुलाला आपणच संस्कार देत असतो. मग मुलगा आणि मुलगी यांना वेगवेगळे संस्कार दिल्याने पुरुषप्रधान संस्कृती रुजते. याला जबाबदार आपणच आहोत, असे जानवे म्हणाल्या. यावेळी प्राची गोखले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह महिला दिनाचा पोवाडा सादर केला. सूत्रसंचालन भारती तारे यांनी केले.