मेहरून नाकाडेरत्नागिरी : हवामानावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आंबा पिकामध्ये वातावरणातील बदलांमुळे अनिश्चितता आली आहे. आंबा व्यवसायाला काहीतरी जोडव्यवसाय सुरू करावा, यासाठी रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील युवक यज्ञेश भिडे याने साडेतीन एकरवर मिरची लागवड केली आहे.
गतवर्षीदेखील यज्ञेश याने दीड एकर क्षेत्रावर मिरची लागवड केली होती. तेव्हा त्याला २४ टन मिरचीचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीच्या यशस्वी प्रयोगानंतर यावर्षी पुन्हा साडेतीन एकरवर त्याने मिरचीची लागवड केली आहे. सध्या या मिरचीची तोड सुरू झाली असून, रत्नागिरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ती विक्रीला पाठविण्यात येत आहे.यज्ञेश याने हॉर्टीकल्चर विषयात पदवी घेतली आहे. वडिलोपार्जित आंबा व्यवसायाबरोबरच त्यांचा प्रक्रिया उद्योग आहे. दरवर्षी हवामानातील बदलांमुळे आंबापीक धोक्यात येत आहे. खर्चाच्या तुलनेत पीक येत नसल्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. मात्र, असे असताना त्याला पूरक व्यवसाय किंवा शेती करावी, असे यज्ञेशने ठरविले.
भाताचे पीक घेतल्यानंतर जमीन मोकळीच असायची. त्यामुळे त्याने त्यावर अन्य पीक घेण्याचे ठरविले. नगदी पिकात कोणत्या पिकाची निवड करावी, याचा त्याने अभ्यास केला. यासाठी कृषीतज्ञांचा सल्ला घेतला व हिरव्या मिरचीचे उत्पन्न घेण्याचे ठरविले.वडील डॉ. विवेक भिडे यांनी त्याला यासाठी प्रोत्साहन दिले. हिरवी तिखट मिरची (जी फोर-सेगमेंट) करत असताना व्हीएनआर सुनिधी जातीची लागवड करण्याचे ठरविले. सांगली येथून एक रूपयाला एक रोप याप्रमाणे अडीच हजार रोपे विकत आणली. त्यासाठी सुरूवातीला जमीन चांगली नांगरून घेतली, रोटा ट्रॅक्टर फिरवला. जमिनीत शेण, लेंडी, गांडूळ खत घातले.
पाच फुटी सऱ्या पाडल्या. त्यानंतर सव्वा फुटाला एक रोपप्रमाणे लागवड केली. लागवडीपूर्वी वाफे/सरी यावर मल्चींग पेपरचे आच्छादन केले. यामुळे तण कमी उगवते व रोगांचे प्रमाण कमी राहते. तसेच पाण्यासाठी ठिबकचा वापर केला. मिरची रोपांची लागवड झाल्यानंतर साठाव्या दिवशी उत्पन्न मिळण्यास सुरूवात होते.
गतवर्षी यज्ञेशने दीड एकर जागेत मिरची लागवड केली होती. त्यावेळी दीड टन उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर यावर्षी यज्ञेशचा विश्वास आणखी दृढ झाला व त्याने यावर्षी मिरची लागवडीचे क्षेत्र वाढवण्याचे ठरविले. साडेतीन एकर क्षेत्रावर त्याने मिरची लागवड केली आहे.
दीड एकर जागेत २० डिसेंबरला रोपे लावली तर दोन एकर क्षेत्रावर २५ जानेवारी रोजी लागवड केली. लागवड केल्यापासून साठाव्या दिवशी उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली. यज्ञेशच्या प्लॉटवर सध्या मिरचीची तोड सुरू असून, दिवसाला ३०० ते ३५० किलो मिरची काढण्यात येत आहे.इतरांना रोजगाराबरोबरच स्वत:ला अर्थार्जन मिळण्यास मदतनिव्वळ आंबा पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा पावसाळ्यानंतर नगदी पिकांची लागवड करणे आवश्यक आहे. कोणत्याही पिकाची लागवड करताना शास्त्रशुध्द पध्दतीचा वापर करणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्राबरोबरच तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन घेणेदेखील आवश्यक आहे. यासाठी नगदी पिकांची निवड करून लागवड केली पाहिजे.
शुगर क्वीन जातीचे कलिंगडमिरची शेजारील २० गुंठ्यांच्या प्लॉटवर यज्ञेशने कलिंगड लागवड केली आहे. या प्लॉटवरदेखील मल्चिंग पेपरचे आच्छादन टाकून शुगर क्वीन जातीच्या कलिंगडाची ६०० रोपे लावली आहेत. सध्या फळे वेलीवर लगडली असून, येत्या आठ ते दहा दिवसात त्यांची तोडणी सुरू होणार आहे. कलिंगडाला उन्हाळ्याच्या दिवसात स्थानिक बाजारपेठेत मागणी चांगली असते. त्यामुळे कलिंगडचा चांगला खप होईल.साडेचार टन मिरचीआतापर्यंत साडेचार टन मिरची काढण्यात आली आहे. दररोज मिरची तोड सुरू असून, ४०, ४५ ते ५० रूपये किलो दराने या मिरचीची विक्री सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही मिरची लिलावासाठी पाठविण्यात येत असल्याने यज्ञेशला रत्नागिरीतच बाजारपेठ मिळाली आहे.मका, झेंडूचीदेखील लागवडमिरची पिकाच्या कडेला सापळा पीक म्हणून यज्ञेशने मका, झेंडू लावला आहे. यातील झेंडूची काढणी सुरू झाली असून, आतापर्यंत ५०० किलो झेंडू काढण्यात आला आहे. शिमगोत्सवामुळे झेंडूला मागणीदेखील चांगली आहे. मका पीकही तयार होत असून, लवकरच त्याची काढणी सुरू होईल. याशिवाय त्याने कोथिंबीर व सिमला मिरचीची लागवडही केली आहे.
या पिकावर आंब्याप्रमाणे वेळोवेळी कीटकनाशक फवारणी करणे आवश्यक आहे. एकाच प्रकारचे पीक घेण्यापेक्षा शेतकऱ्यांनी विविध पिकांची निवड करावी. तरूणांनी रोजगार शोधण्यापेक्षा वडिलोपार्जित जमिनीत शेती केली तरी अन्य लोकांना रोजगाराबरोबरच अर्थार्जनाचे साधनही प्राप्त होईल.- यज्ञेश विवेक भिडे,मालगुंड