रत्नागिरी : अनाथ, निराधार मुले तसेच निराधार महिला व पुरुषांसाठी कार्यरत असलेली माहेर संस्थेत यावर्षी प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रवेशितांनी भेटकार्डच्या माध्यमातून संदेश दिले आहेत.भेड कार्डवर दिवाली का जश्न मनाएं पर्यावरण सुरक्षित बनाए हवा और ध्वनी प्रदूषण को काम करने के लिए सुरक्षित दिवाली मनाए यांसारखे सामाजिक व पर्यावरणपूरक संदेश लिहून संस्थेत दिवाळीसाठी येणाऱ्या हितचिंतकांचे प्रवेशितांनी बनविलेले ग्रिटिंग कार्ड व कागदी फुले देऊन शुभेच्छापर प्रबोधन करण्यात आले आहे.
माहेर संस्थेत ३५ अनाथ निराधार मुले-मुली तसेच ६० निराधार महिला व पुरूष राहात आहेत. या सर्व उपेक्षितांना जगण्याचा आनंद घेता यावा, या उद्देशाने संस्थेत विविध कार्यक्रम, सण, उत्सव साजरे केले जातात. संस्थेच्या बालकांनी येथील अधीक्षक सुनील कांबळे यांच्याच मार्गदर्शनाखाली दिवाळीची तयारी केली.ग्रिटिंग, कागदी फुले, रांगोळी, सजावटही संस्थेतील प्रवेशितांनी केली आहे. समाजातील हितचिंतक संस्थेला फराळ, नवे कपडे, साबण, तेल, उटणे इत्यादी देत असतात. दरवर्षीप्रमाणे जॉय आॅफ गिव्हिंग ग्रुप, रत्नागिरी यांनी सर्व प्रवेशितांना भेट वस्तू दिल्या.
संस्थेतील सर्व प्रवेशितांनी दिवाळी फराळ व मिठाई यावर यथेच्छ ताव मारला. निराधार महिलांनी निराधार पुरुषांना औक्षण करून भाऊबीज साजरी केली. माहेर संस्थेत सहभागी झालेल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद कायम राहण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमातून त्यांना मनमोकळेपणाने जगता येणे शक्यही होत आहे. त्यामुळे हे उपक्रम उपयुक्त ठरत आहेत.या उत्सवाच्या तयारीत संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे, मीरा गायकवाड, अमित चव्हाण, आशिष मुळ्ये, शीतल हिवराळे, विजया कांबळे, शिल्पा डांगे, अनुदेवी राजपुरोहित, फुलाबाई पवार, स्मिता मिश्रा, मार्था पॉल, जोसेफ दास तसेच सर्व प्रवेशित यांचे योगदान लाभले.