रत्नागिरी : शहीद जवांनाच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून त्यांच्या माहितीचे फलक कार्यालय परिसरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना शहिदांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ही संकल्पना सुरू केली आहे.देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांमुळेच देशाचा प्रत्येक नागरिक निर्धास्त आहे. भारत - पाकिस्तान त्याचबरोबर भारत - चीन यांसारख्या मोठ्या युद्धांचा फटका देशाला बसला. मात्र, भारतीय जवानांमुळे देश सुरक्षित आहे. देशासाठी अनेक सैनिकांनी बलिदान दिले. यात रत्नागिरीच्या अनेक सुपुत्रांचा समावेश आहे. अजूनही अनेक परकीय आक्रमणाचा धोका देशाला सतावत आहे. यासाठी आपले सैनिक तळहातावर प्राण घेऊन देशासाठी लढत आहेत.जिल्ह्यातील या सुपुत्रांचा पराक्रम सर्वांपर्यंत पोहोचवावा. त्यातून नव्या पिढीला देशासाठी सेवा करण्याची प्रेरणा मिळावी, या हेतूने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने गेल्या महिन्यापासून हा उपक्रम सुरू केला आहे.
भारत - पाकिस्तान - चीन या युद्धांबरोबरच काश्मीर, मिझोरम लढा तसेच इतर कारणांनी शहीद झालेल्या जवानांची विस्तृत माहिती सैनिक कल्याण कार्यालय परिसरात फलकाद्वारे प्रसिद्ध करण्यास सुरूवात केली आहे. त्यात शहीद जवानांचा फोटो, नाव, गाव, कुठली मोहीम आदी माहिती या फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यालयातच नव्हे; तर या परिसरातील इतर कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांनाही याबाबत माहिती होत आहे.सैनिक कल्याण विभागाच्या माध्यमातून माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. मुलांना शिक्षणाच्या सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या निवासाची सोय होण्याच्या दृष्टीनेही या कार्यालयामार्फत चिपळूण येथे सैनिकांच्या पाल्यांसाठी मुली व मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह चालवली जात आहेत. त्याचबरोबर खेड येथे मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह आहे. या वसतिगृहातही काही शहीद जवानांची माहिती असलेली पोस्टर्स लावली आहेत. शहीद जवानांची माहिती व्हावी, त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, हा मुख्य उद्देश आहे.स्तुत्य उपक्रमजिल्हाधिकारी कार्यालयाच्या या प्रशासकीय इमारतीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयासह इतरही अनेक कार्यालये आहेत. या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनाही जिल्ह्यातील या शहीद जवानांविषयी माहिती होण्यास मदत होत आहे. त्यामुळे अनेकांकडून हा उपक्रम स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.