रत्नागिरी : गावापलिकडचं जग पाहून हरखून गेलो, समुद्राच्या लाटांवर स्वार झालेल्या नक्षलवादी प्रभावित गावांमधील विद्यार्थ्यांचे उद्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 06:16 PM2018-01-11T18:16:49+5:302018-01-11T18:23:44+5:30
‘समुद्र खूप मोठा असतो, अथांग असतो, असं ऐकलं होतं. पण दुर्दैवाने आम्हाला तो जवळून पाहण्याची, त्याच्या अथांग लाटांवरती स्वार होण्याची संधी कधीच मिळाली नव्हती. ती आज मिळाली. आमच्या गावापलिकडचं जग खरोखरच खूप मस्त आहे....’
विहार तेंडुलकर
रत्नागिरी : ‘समुद्र खूप मोठा असतो, अथांग असतो, असं ऐकलं होतं. पण दुर्दैवाने आम्हाला तो जवळून पाहण्याची, त्याच्या अथांग लाटांवरती स्वार होण्याची संधी कधीच मिळाली नव्हती. ती आज मिळाली. आमच्या गावापलिकडचं जग खरोखरच खूप मस्त आहे....’
हे उद्गार आहेत, गडचिरोलीतील नक्षलग्रस्त गावांमध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे. मृत्यू कायम जवळ घेऊन जीवन जगणाऱ्या गडचिरोलीतील भागातील मुलांनी रत्नागिरी आणि गणपतीपुळेचा दौरा केला, त्यावेळी रत्नागिरीचं सौंदर्य अन् अथांग सागर पाहून जणू त्यांनी त्यांच्या निष्पाप विचारांनाच वाट मोकळी करून दिली.
नक्षलग्रस्त परिसरामुळे कायम मनात भीती अन् अठराविश्व दारिद्र्य अशा कठीण परिस्थितीतही शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील नक्षलवादी जिल्हा असलेल्या गडचिरोलीतील ८० विद्यार्थी कोकणचं निसर्गसौंदर्य, अफाट समुद्रकिनारा पाहून भारावून गेले. एका वेगळ्याच दुनियेत आल्याच्या प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांच्या चेहºयावर झळकत होत्या.
गडचिरोली हा जिल्हा नक्षलवाद्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. यामुळे या जिल्ह्यात आपली बदली झाली की शासकीय कर्मचारीही हबकून जातात. मात्र येथील जिवघेण्या नक्षलवादी वातावरणात वाढणाऱ्या, गरिबीशी दोन हात करत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांनी तरी अशा वाम चळवळीला जाऊ नये, यासाठी येथील विद्यार्थ्यांना राज्याच्या कानाकोपऱ्यात सहलीच्या माध्यमातून फिरवण्यात येते.
राज्य शासनाने नक्षलवादी भागातील विद्यार्थ्यांना बाहेरचे जग बघता यावे, त्यांनी नक्षलवादी मार्ग पत्करू नये, यासाठी शासनाने आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजना सुरु केली आहे. या योजनेव्दारे गडचिरोलीतील ८० विद्यार्थ्यांना रत्नागिरीचे दर्शन घडवण्यात आले.
या जिल्ह्यात अनेक तरूण हे नक्षलवादाकडे वळतात. त्यामुळे त्यांना या चळवळीपासून वैचारिकदृष्ट्या दूर नेण्यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना ही सफर घडवण्यात आली.
नक्षलवादी होऊन कोणतीच सुधारणा घडवता येत नाही, हे विद्यार्थीदशेतच त्यांच्या मनावर बिंबवले जावे, यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातर्फे या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व रत्नागिरी दर्शनची व्यवस्था करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी दर्शन झाल्यानंतर गणपतीपुळे येथील परिसराचा तसेच समुद्रसफरीचा आनंद लुटला.
रत्नागिरी-गणपतीपुळे रोडवरील एका सभागृहात या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी या विद्यार्थ्यांसाठी खास कोकणी बेत आखण्यात आला होता. कोकणी जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतल्यानंतर ही सहल महाबळेश्वर (सातारा)कडे मार्गस्थ झाली.
काय आहे योजना?
महाराष्ट्र शासनाच्या पोलिस विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्यातर्फे नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजना राबवली जाते.
या सहलीसाठी गडचिरोली पोलिसांमार्फत गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील दुर्गम भागातील आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते. सहलीत विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक तसेच औद्योगिक, सांस्कृतिक विकासाचे दर्शन घडविण्यात येते.
गडचिरोलीत अनेक उपक्रम सुरु
गडचिरोलीतील काही गावे ही अजूनही नक्षलग्रस्त आहे. या नक्षलप्रभावित गावांमधीलच विद्यार्थ्यांना या सहलीत समाविष्ट करण्यात येते. प्रत्येक सहलीत ४० विद्यार्थी व ४० विद्यार्थींनी तसेच गडचिरोली पोलिसांची एक टीम समाविष्ट असते.
नक्षलग्रस्त भागात तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गडचिरोली जिल्हा दत्तक घेऊन त्याठिकाणी अनेक उपक्रम सुरु केले. जनजागृती करतानाच अनेक विकासकामांसाठी त्याठिकाणी निधीचा ओघ सुरु झाल्याने गावातील वातावरण निवळत आहे.
कुणीतरी काहीतरी गमावलंय.
नक्षलग्रस्त चळवळी अगदी जवळून पाहिलेल्या या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी तर त्यांचे पालकही या चळवळीत गमावलेत. पालक गमावल्याचं दु:खं क्षणभर का होईना; समुद्रात विहार करताना हे सारे विद्यार्थी विसरून गेले होते.