रत्नागिरी : पर्यावरणाला पोषक तसेच दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी राज्य शासनाने सौरऊर्जा स्रोताला प्रोत्साहन दिले आहे. सौरकृषी पंपासाठी शेतकऱ्यांकडून वाढीव प्रतिसाद असताना महावितरणकडून नवीन जोडण्यांना स्थगिती देण्यात आली आहे.
केंद्र शासनाने राष्ट्रीयस्तरावर पाच लाख सौरकृषिपंपाच्या योजनेसाठी ४०० कोटीची तरतूद घोषित केली होती. राज्य सरकार पाच टक्के, केंद्र सरकार ३० टक्के अनुदान, तर उर्वरित ६० टक्के अर्थसहाय्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले होते. राज्यभरात सर्व जिल्ह्यातून सौरकृषीपंपासाठी आवाहन करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ८० पंपाचे उद्दिष्ट असताना ११५ शेतकऱ्यांनी अर्ज पाठविले होते. पैकी ५९ अर्ज मंजूर करण्यात आले असून, ५३ शेतकऱ्यांना पंप बसवण्याची वर्कआॅर्डर देण्यात आली होती, त्यापैकी ५० शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत. ४६ शेतकऱ्यांचे कृषिपंप बसविण्यात आले असून, उर्वरित ४ शेतकऱ्यांना जोडण्यांसाठी वर्कआॅर्डर देण्यात आली आहे. मात्र, सद्यस्थितीत जोडण्या थांबवण्यात आल्या आहेत.
पाच एकरपेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ३.५ किंवा ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे सौरकृषिपंप देण्याच्या योजनेसाठी मान्यता देण्यात आली आहे. विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकऱ्यांनाही या योजनेसाठी आवाहन करण्यात आले होते. महावितरणकडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या ग्राहकांपैकी ज्यांना तांत्रिक अडचणीमुळे नजीकच्या काळात वीजपुरवठा शक्य नाही, अशा शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन केले होते. विद्युतीकरणासाठी वन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळत नसलेल्या भागातील शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येत होता. सौरकृषिपंप बसवण्यासाठी दिलेली मुदत संपल्यामुळे केंद्र शासनाने अनुदान देण्यास नकार दिल्यामुळेच ही योजना आता बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सौरकृषिपंप योजनेकडे ‘लाईफ टाइम’ योजना म्हणून पाहिले जात असल्याने शेतकऱ्यांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. शिवाय कंपन्यांनी सौरकृषीपंप बसवल्यानंतर पाच वर्षे सौरपंपाच्या देखभालीची जबाबदारी कंपन्यांवर देण्यात आली होती. पंपासाठी ६० टक्के रक्कम भरल्यानंतर प्रत्येकी तीन महिन्यांनी समान हप्ते सलग पाच वर्षात ३० टक्के व उर्वरित १० टक्के रक्कम पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणार होती. राज्यात शेतकऱ्यांसाठी २०१५ मध्ये शासन निर्णय जारी करून पथदर्शी कार्यक्रम राबवण्यात येत होता. शेतकऱ्यांनाही सौरकृषिपंपाचे महत्व लक्षात आल्याने मागणी वाढली होती. शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभत असताना जोडण्या तूर्तास थांबविण्यात आल्या आहेत.
अर्ज स्वीकारण्याचे काम सुरूच-
रत्नागिरी जिल्ह्याला ८० सौरकृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत ४६ पंप बसविण्यात आले आहेत. महावितरणकडे ११५ शेतक-यांनी अर्ज पाठविले आहेत. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार नवीन जोडण्या थांबविण्यात आल्या असल्या तरी शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. सौरकृषिपंप जोडण्यांच्या नियमांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या जोडण्या महावितरण कंपनीतर्फे थांबविण्यात आल्या आहेत. अर्ज स्वीकारले तरी शेतकऱ्यांना कोटेशन दिले जात नाही, अर्ज केवळ रेकॉर्डसाठी घेऊन ठेवण्यात येत आहेत. जोडण्या देण्याचे आदेश येताच तातडीने शेतकऱ्यांना सौरकृषिपंपाच्या जोडण्या दिल्या जाणार आहेत.
- पी. जी. पेठकर, प्रभारी मुख्य अभियंता, कोकण परिमंडल
पंपांच्या क्षमतेनुसार किंमती व अनुदान-
सौरकृषिपंपासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येत होते. तीन एचपीएसी पंपाची किंमत ३ लाख २४ हजार असून, त्यासाठी केंद्र शासनाकडून ९७ हजार २००, राज्य शासनाकडून १६ हजार २०० रूपयांचे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात येत होते. लाभार्थी शेतकºयाला पाच टक्के रक्कम म्हणजे १६ हजार २०० रूपये इतकेच भरावे लागत होते. उर्वरित एक लाख ९४ हजार ४०० रूपयांचे कर्ज पंपासाठी शेतकऱ्यांना घ्यावे लागत होते. पंपांच्या क्षमतेनुसार त्याच्या किमती व त्यापटीत अनुदान देण्यात येत होते.