गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यातील पाली येथील खानू गावामध्ये जहाज आणि विमाने बनविण्याचा कारखाना आहे, असे म्हटले तर यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. मात्र, यशवंत मावळणकर आणि त्यांचा मुलगा मंदार मावळणकर यांनी जहाज आणि विमानांच्या प्रतिकृती बनवून गावाची आणि जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या या हॉबी क्राफ्ट कारखान्याला गुहागर येथील श्री देव गोपाळकृष्ण विद्यामंदिरच्या १९९५ सालच्या माजी विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि सर्वच भारावून गेले.यावेळी १९९५ बॅचच्या विद्यार्थ्यांनी खानू गावात स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. तेथील शासकीय सामाजिक वनीकरणाच्या वनराईला भेट दिली आणि विविध वनस्पतींची माहिती करून घेतली. यावेळी मंदार कानडे, योगेश बेंडल, मंदार गाडगीळ, अव्दैत जोशी, संतोष सांगळे, प्रशांत कानडे, दीपक माटल, केदार परचुरे, वैभवी जोगळेकर, प्राजक्ता जोशी, अंजली साटले, योगिता साखरकर, योगिनी निगुडकर, रुपाली शेटे, रेश्मा विचारे, संतोषी मर्दा, अनाविका विखारे, प्रीती कनगुटकर आणि शीतल मोडक यांच्यासह अन्य उपस्थित होते.मावळणकर यांच्या कारखान्याला भेट देऊन त्यांच्या उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी त्यांचा मुलगा मंदार मावळणकर यांनी त्याच्या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. कोणत्याही प्रकारचे विशेष तंत्रशिक्षण न घेता केवळ इच्छेच्या जोरावर छंद जोपासत आजवर इथपर्यंत मजल मारल्याचे त्यांनी सांगितले.
विविध ठिकाणच्या निरीक्षणातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमान आणि सैन्यामध्ये नौदलाला लागणाऱ्या लढावू आणि मालवाहू जहाजांच्या प्रतिकृती बनविण्याचे धाडस यशवंत मावळणकर गेली अनेक वर्षे करत आहेत.
त्यांचा मुलगा मंदार यानेही बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडिलांच्या या व्यवसायात मदत करत असे. त्यातून त्यालाही आवड निर्माण झाली आणि अनुभवातून त्याने या जहाज आणि विमानांचे आराखडे बनवून विमाने आणि जहाजाच्या प्रतिकृती तयार करू लागला.यशवंत मावळणकर यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईतील मरीन लाईन येथील एअरो आणि शिप मॉडेलिंग इंडिया हॉबी सेंटर या दुकानामध्ये नोकरी केली. हे दुकान कोलकाता येथील सुरेश कुमार यांच्या मालकीचे होते.
काही वर्षे काम केल्यानंतर आलेल्या अनुभवातून यशवंत यांनी मरीन लाईन येथेच हॉबी क्राफ्ट ही स्वत:ची कंपनी स्थापन केली. व्यवसायाचा श्रीगणेशा करवत आणि रंधा मारण्याच्या मशिनने केला. दुकानात जहाज आणि विमान यांच्या प्रतिकृती तयार होऊ लागल्या. पंरतु काही कारणास्तव तेथून काम बंद करावे लागले. त्यानंतर त्यांनी गुहागरमध्ये आपल्या सासुरवाडीमध्ये काही वर्षे हे काम सुरू ठेवले.एनसीसीच्या अभ्यासक्रमाशी संबंधित शिप मॉडेलिंंग हा विषय आहे. अनेक एनसीसी युनिटना त्यांची मॉडेल्स पुरवण्यात आली आहेत्त. युध्दनौकांवरील तोफा, मिसाईल लॉचर, मास्ट, रडार, अपरडेक आदी भागांची माहिती एनसीसी विद्यार्थ्यांना या मॉडेलमधून मिळते.
या प्रतिकृती बलसा नावाचे लाकूड वापरून बनवण्यात येतात. त्यांच्या आवडीतून निर्माण झालेल्या व्यवसायाकडे करिअरच्या माध्यमातून पाहिल्यास भविष्य उज्ज्वल घडू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विविध प्रतिकृतीस्टॅटिक मॉडेल, एरोप्लेन, हेलिकॉप्टर, ग्लाईडर, कन्ट्रोल लाईन ग्लाईडर, रिमोट कन्ट्रोल फ्री फ्लाईट ग्लाईडर, रबर पॉवर, टी लाईन ग्लाईडर अशा विमानांची मॉडेल्स देशातील एनसीसी युनिटना पाठवली जातात. तसेच एअरो मॉडेलबरोबर शिप मॉडेलिंगच्या प्रकारातही त्यांनी थक्क करणारे मॉडेल तयार केले आहे. यामध्ये फ्रिंगेट, डिस्ट्रॉवर, एअर कॉफ्ट कॅरिअर, लँडिंग कॉफ्ट, सेलिंग बोट, पाणबुडी, विंक्रांत बोट आणि मॉडेल प्रतिकृती तयार केल्या आहेत.