रत्नागिरी : लाल मातीतही टनावारी ऊस, राजापूरच्या पूर्व भागात लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 02:56 PM2019-01-08T14:56:42+5:302019-01-08T15:01:33+5:30
काळ्या मातीची शान असलेला ऊस कोकणातील लाल मातीत पिकत नाही, असे मानले जाते. मात्र, प्रबळ इच्छाशक्ती असेल आणि त्याला खंबीर साथ मिळाली तर मातीतून सोनेही पिकवता येते. याची प्रचिती राजापूर तालुक्यातील पूर्व भागात येते.
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : काळ्या मातीची शान असलेला ऊस कोकणातील लाल मातीत पिकत नाही, असे मानले जाते. मात्र, प्रबळ इच्छाशक्ती असेल आणि त्याला खंबीर साथ मिळाली तर मातीतून सोनेही पिकवता येते. याची प्रचिती राजापूर तालुक्यातील पूर्व भागात येते.
मूरसारख्या ग्रामीण भागात शेतकरी गेली १० वर्षे उसाची यशस्वी लागवड करत आहेत. या भागातून सुमारे ५ हजार टन इतका ऊस कोल्हापूर येथील साखर कारखान्याला दिला जात आहे. या भागातील जमीन ओलिताखाली येण्यासाठी वाळवंड धरण तातडीने पूर्ण होण्याची गरज आहे. हे धरण पूर्ण झाल्यास हा भाग खऱ्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् होण्यास मदत होणार आहे.
कोकणात भात हे मूळ उत्पन्न आहे. त्याचबरोबर नाचणी, वरी यांचेही पीक घेतले जाते. तसेच आंबा, काजू, नारळ यांचे उत्पन्न घेतले जाते. परिसरात साग, फणस, जांभूळ, हेळ, ऐन, किंजळ यांचीही मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. त्याचबरोबर ३ देवराई असून, मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपत्ती आहे. सध्या या भागात ऊस आणि केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जात आहे.
राजापूर तालुक्यातील पूर्व भाग म्हणजे सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेला परिसर. उंचच उंच डोंगर रांगाच्या पायथ्याशी वसलेल्या या भागातील शेतकऱ्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याची किमया मूर ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संजय सीताराम सुतार यांनी केली आहे. गावात मोठ्या प्रमाणात जमीन आहे. याच जमिनीतून सोनं पिकविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना कृषीचे महत्व पटवून देत त्यांनी या भागात असलेल्या मुबलक पाण्याच्या जोरावर उसाची शेती करण्याचा पर्याय दिला. उसाची लागवड करण्यासाठी मुबलक पाणी असणे गरजेचे आहे. हे पाणी शेतात येण्यासाठी शेतकऱ्यांना विजेची सुविधा करून देण्यात आली.
एवढ्यावरच न थांबता कृषिपंपाची व्यवस्था करून देण्यात आली. त्यामुळे शेतापर्यंत पाणी येण्यास सुलभ झाले आहे. त्याचबरोबर सिंचन विहिरीची उपलब्धता करून देण्यात आली. शेतकऱ्यांसाठी वनराई बंधारे बांधून देण्यात आले.
या भागातील ९ शेतकरी सध्या उसाचे उत्पन्न घेत आहेत. त्याचबरोबर आदर्श शेतकरी समूह गट आणि शिवशंभो शेतकरी समूह गटाद्वारे उसाची लागवड केली जात आहे. या भागात तयार होणारा ऊस कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील साखर कारखान्याला दिला जातो.
गतवेळच्या हंगामात या भागातून सुमारे ५ हजार टन इतका ऊस कारखान्याला दिला गेला. मूर गावासह वाळवंड, चिखलेवाडी आजिवली, जवळेथर, मिळंद या गावांबरोबरच जामदा नदीच्या उगमस्थानी असलेल्या कोळंब, काजिर्डा या भागातूनही ऊस कोल्हापूरला पाठविला जातो.
लोकप्रतिनिधींनी अणुऊर्जा आणि रिफायनरी एवढ्यावरच लक्ष केंद्रीत न करता कृषी क्षेत्राकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या भागातील शेतकरी शेतीकडे वळत आहेत. पण त्यांना पाठबळ मिळणे गरजेचे आहे. याठिकाणी पिकणाऱ्या मालाला कृषी उत्पन्न बाजार समितीने हमीभाव देऊन बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे. पण तसे होत नाही. त्यामुळे छोटे शेतकरी शेती करण्यास पुढे येत नाहीत.
- संजय सीताराम सुतार,
सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत, मूर
मुंबईत जाऊन नोकरी करत बसण्यापेक्षा गावातील जमिनीत घाम गाळल्यास निश्चितच त्याचे चांगले फळ मिळते. या भागातील जमीन ऊस लागवडीसाठी फायदेशीर आहे. एकदा ऊसाची लागवड केल्यास तीन पिके घेता येतात. मात्र, ऊसाला चांगला हमीभाव मिळणे गरजेचे आहे.
- उत्तम घागरे, शेतकरी
उसाचे उत्पन्न घेण्यासाठी आवश्यक असणारी जमीन याठिकाणी आहे. मेहनत कमी आणि उत्पन्न जास्त असे हे पीक आहे. त्यामुळे उसाची शेती फायदेशीर ठरणारी आहे. वाळवड धरण पूर्ण झाल्यास आणखीन उसाची लागवड करता येईल.
- रमेश बारका आपटे, शेतकरी.
वाळवड धरणाची आवश्यकता
या भागासाठी वाळवड धरण पूर्ण होणे गरजेचे आहे. हे धरण पूर्ण झाल्यास जामदा नदी बारमाही वाहात राहील. त्याचबरोबर येथील दोन ओढेही पाण्याने परिपूर्णपणे वाहात राहतील. सद्यस्थितीत हे धरण पूर्ण होण्यासाठी ३७ कोटी मंजूर झाले असून, प्रशासकीय मंजुरीमुळे ते अडकून पडलेले आहेत. हे धरण पूर्ण झाल्यास मूर, वाळवड, चिखलेवाडी, तिरवडे, नेरले, सावडाव, मिळंद, जवळेथर, आजीवली, केळवली, मोसम, खारेपाटणपर्यंतचा परिसर ओलिताखाली येणार आहे.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात समावेश व्हावा
कारखान्यांच्या सेस सभासदांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळे त्यांचा ऊस आधी उचलला जातो. साखर कारखान्यांनी ताम्हाणे पंचायत समिती गणाचा समावेश आपल्या कार्यक्षेत्रात केल्यास येथील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. डी. वाय. पाटील साखर कारखान्याने सिंधुदुर्गाचा त्यांच्या कार्यक्षेत्रात समावेश केला आहे. तसाच या भागाचाही समावेश करून शेतकऱ्यांना सभासद करून घेतले पाहिजे.
चिपाड दूध उत्पादन संघाला
याठिकाणी तयार होणाऱ्या उसाचे चिपाड भास्कर सुतार सहकार दूध उत्पादन संघाला दिले जाते. जनावरांची संख्या वाढावी आणि दुधाचे उत्पादन वाढावे, यासाठी सरपंच संजय सुतार यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने त्यांनी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले आहे.
कारखान्यात बसून राहावे लागते
हा भाग कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नसल्याने उसाची विक्री करण्यासाठी कारखान्यात बसून राहावे लागते. कारखान्यात वारंवार खेपा मारल्यानंतर हा ऊस उचलला जातो. त्यामुळे कारखान्यांनी येथील परिसराचा त्यांच्या कार्यक्षेत्रात सामावेश करून घेणे आवश्यक आहे.
रोजगार नसल्याने तरूण मुंबईकडे
गावात रोजगार नसल्याने अनेक तरूण मुंबईकडे जात आहेत. या तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी संजय सुतार यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लोकप्रतिनिधींनीही लक्ष देणे गरजेचे आहे. या भागात शेतीचे उत्पादन वाढल्यास तरूणांच्या हाताला रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. गावात रोजगार मिळाल्यास तरूण गावातच थांबतील.
काजू, केळीचीही लागवड
या भागातील ५० टक्के क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. बहुतांश डोंगरावर काजूची लागवड करून डोंगर हिरवागार करण्यात आला आहे. त्याचबरोबर १० एकर जमिनीवर रमेश बारका आपटे आणि पुरूषोत्तम घागरे यांनी केळीची लागवड केली आहे. ही केळी स्थानिक बाजारपेठेत किंवा कोल्हापूरमध्ये विक्रीसाठी दिली जातात. मात्र, त्यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना परजिल्ह्यावरच अवलंबून राहावे लागते.
ऊसतोड टोळ्या मिळत नाहीत
उसाची तोड करण्यासाठी विशिष्ट टोळ्या काम करतात. साखर कारखान्यांकडे या टोळ्या असतात. पण सध्या या टोळ्या मिळत नसल्याने शेतकऱ्यांना स्वत:लाचा उसाची तोड करावी लागते.
सुगंधी शेती
या भागात ऊसाबरोबरच सुगंधी वनस्पतींचीही शेती केली जाते. सुमारे १० एकरावर ही शेती करण्यात आली आहे. या वनस्पती प्रमुख्याने अत्तर आणि सुगंधी द्रव्ये तयार करण्यासाठी वापरल्या जातात.