देवरूख : चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपता म्हणजे श्रीगणेश. यावर्षी श्रींचे १३ सप्टेंबर रोजी घरोघरी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर देवरूख शहरातील गणेश चित्रशाळांमध्ये प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती दाखल झाल्या आहेत. आठ महिने सुन्या सुन्या वाटणाऱ्या गणेश चित्रशाळा पुन्हा गजबजू लागल्या आहेत. यामुळे भक्तगणांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत.कोकणात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. सर्वजण आतुरतेने या सणाची वाट पाहात असतात. नोकरी धंद्यानिमित्त मुंबई, पुणे यांसारख्या शहरात राहणारे चाकरमानी आवर्जुन गावात येऊन उत्सवाची मौजमजा लुटतात. गणेशोत्सव यावर्षी १३ सप्टेंबर ते २३ सष्टेंबर या कालावधीत साजरा होणार आहे.
देवरूख शहरातील गणेश चित्रशाळांमध्ये पीओपीच्या २ फुटांपासून ६ फुटांपर्यंत मूर्ती दाखल झाल्या आहेत. शहरात आप्पा साळसकर, भाई कुमटेकर, नागेश बारटक्के, दत्ता शिंदे, नंदकुमार पाटेकर, आशिष बेलवलकर, अनिल व रवींद्र राजवाडे, श्रीकांत शेट्ये, नरेंद्र भोंदे, भाऊ घडशी, सुधीर सालम, बापू नारकर आदींच्या गणेश चित्रशाळा आहेत.यावर्षी श्रींच्या मूर्ती १३ सप्टेंबर रोजी घरोघरी विराजमान होणार आहेत. १५ रोजी गौरीचे आगमन, १६ रोजी गौरी आवाहन व १७ रोजी गौरींसह पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. २३ सप्टेंबर रोजी अनंत चतुदर्शीपर्यंत स्थानापन्न होणाऱ्या गणरायांना निरोप दिला जाणार आहे. हा उत्सव तीन महिन्यांवर येऊन ठेपला आहे.काही गणेश चित्रशाळांमध्ये पीओपीच्या गणेशमूर्ती या पेण, कोल्हापूर येथून आणल्या जातात. पीओपीच्या मूर्ती या सुंदर, रेखीव व वजनाने हलक्या असतात. मातीच्या मूर्तीपेक्षा पीओपीच्या मूर्तीची किंमत कमी असते. यामुळे भक्तगण पीओपीच्या मूर्तीला जास्त पसंती असते. भव्य मूर्ती पाहण्यासाठी भक्तगणांची पावले चित्रशाळेच्या दिशेने वळू लागली आहेत.