रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात वादळी पावसाला सुरुवात झाली असून रविवारी सायंकाळनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रात्रभर रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. या पावसामुळे रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर तालुक्यातील अनेक भागांमध्ये दरड कोसळण्याचे प्रकार घडले. तर काही भागात रस्ते खचले. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८८८.२० मिलीमीटर (८८.६९ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक १९३.३० मिलीमीटर तर त्याखालोखाल संगमेश्वर १२३.९० आणि राजापूर तालुक्यात ११४.८० मिलीमीटर पाऊस पडला.
जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. सायंकाळनंतर मुसळधार पाऊस सुरू होतो. जोडीला वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा चमचमाट. रात्रभर झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यात दरड कोसळणे, रस्ता खचणे आदी प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यात वायंगणी येथे दरड कोसळली. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे. कांटे येथील रस्त्यावरील मोरी खचल्याने रस्ता बंद झाला आहे. संगमेश्वर रस्त्यावर झाडे कोसळल्याने हा रस्ता बंद होता. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाडे हटविण्याचे काम सुरू आहे.
रत्नागिरी तालुक्यात उक्षी येथे १२ रोजी स्वप्नाली कांबळे यांच्या घराच्या शेजारी दरड कोसळली. या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलविले. पोमेंडी येथील सुरेश पवार यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने अंशत: नुकसान झाले. पोमेंडी येथील (टेंभे पूल) एम.एच.एएफ ४२१६ ही मोटारसायकल वाहून गेली. तसेच हरचिरी येथे रात्री साडेअकरा वाजता दरड कोसळली तसेच शिरगांव शिवरेवाडी येथे रस्ता खचल्याची घटना घडली. लांजा तालुक्यात लांजा-वेरळ रस्त्यावर दरड कोसळल्याने हा रस्ता बंद बंद ठेवण्यात आला. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे. या तालुक्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
सोमवारी सकाळीही काही काळ पावसाने उघडीप दिली होती. अधूनमधून जोरदार सरी येत होत्या. पुन्हा सायंकाळी पावसाचा जोर वाढला. हवामान खात्याने १५ जूनपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यादृष्टीने पूरप्रवण तसेच दरडप्रवण गावांमध्ये आपत्ती आल्यास अशा ठिकाणी मदतकार्य करण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दाखल झाले आहे.
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांना खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.