कलेचे वास्तविक स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:40+5:302021-07-19T04:20:40+5:30

याचा अर्थ - जो मनुष्य साहित्य, संगीत, कला यापासून वंचित आहे. तो शेपटी व शिंग नसलेल्या प्राण्यासारखा आहे. या ...

The real nature of art | कलेचे वास्तविक स्वरूप

कलेचे वास्तविक स्वरूप

googlenewsNext

याचा अर्थ - जो मनुष्य साहित्य, संगीत, कला यापासून वंचित आहे. तो शेपटी व शिंग नसलेल्या प्राण्यासारखा आहे.

या पृथ्वीवरील सर्व सजीव प्राणीमात्रांमध्ये जन्मतःच निसर्गाने विभिन्न स्वरूपात कला दिली आहे. प्रत्येक सजीवाचे कला सादर करण्याचे स्वरूप वेगवेगळे आहे. वनस्पती आपल्या रंगांनी, आकार, पाने-फुले यांनी विशिष्ट प्रकारचे मनोहारी दृश्य तयार करतात. पशु-पक्षी, कीटक उदा. सुगरण, कोळी, सुतार पक्षी, मुंग्यांचे वारूळ हे वास्तुकलेचे उत्तम उदाहरण ठरते. सरड्याची रंग बदलण्याची कला ही त्याचा शिकारी पक्षाकडून जीव वाचवते. ही कला त्याला जगण्यासाठी निसर्गाकडून नकळत मिळाली आहे. मोर आपला पिसारा फुलवून थुई-थुई नाचतो हे नृत्यकलेचे उत्तम उदाहरण आहे.

भारतीय साहित्यामध्ये चौसष्ट कलांचा उल्लेख केलेला आढळतो. भारतीय धर्मग्रंथांमध्ये सत्य युगातील श्री विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांना आठ कला अवगत होत्या. श्रीराम यांना बारा कला तर श्रीकृष्ण यांना जन्मताच सोळा व नंतर चौसष्ठ कला अवगत होत्या. यामुळेच श्रीकृष्णांना पूर्ण अवतार संबोधतात.

या चौसष्ट कलांच्या यादीमधील पहिल्या सहा कला म्हणजेच नृत्य, नाट्य, गायन, चित्र, शिल्प, वादन यामधील चौथे नाव ‘आलेख्य’ म्हणजेच चित्रकलेचे आहे. या चौसष्ठ कलांमधील कोणतीही एक कला मानवाला अवगत असली पाहिजे नाहीतर त्याचे जीवन व्यर्थ आहे. जीवनात कला नसलेल्यांचे आयुष्य मीठ नसलेल्या बेचव जेवणासारखे असते.

कला ही मानवाला एक विशिष्ट प्रकारची दृष्टी देते. मानवाला संयमी व प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन कलेमधून मिळतो. एखादे लहान मूल भिंतीवर अथवा कागदावर रंगीत खडूने रेघोट्या मारते, तेव्हा इतरांना जरी त्या व्यर्थ रेघोट्या वाटत असल्या तरी त्या लहान मुलाच्या मनातील भावना दृश्य स्वरूपात त्याच्या हातून आपसूक उमटत असतात.

अश्मयुगातील मानवाने त्याकाळी गुहेच्या अंतर्भागात काढलेली चित्रे आता जरी ती बेढब व शास्त्रोक्त वाटत नसली तरी त्या काळी त्या आदिमानवाच्या मनातील प्रतिमा जशाच्या तशा भिंतीवर उमटल्या आहेत, त्याच कलेला आज ‘वारली शैली’ (Varli Art) संबोधले जाते.

आजच्या आधुनिक गतिमान विज्ञान युगात कलेचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले आहे. कला ही एक छंद म्हणून न राहता त्याला व्यावहारिक स्वरूप प्राप्त झाले आहे. लोकांना आता वास्तवानुसारी (Realistic) चित्राबरोबर अमूर्त (Non-realistic) चित्रशैलीची पण ओढ वाटू लागली आहे. पाश्चात्य देशात चित्रकलेकडे एक फावल्या वेळेतील छंद म्हणून न बघता त्याकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून बघितले जाते. आपल्या देशातील शहरी समाज हा ग्रामीण समाजापेक्षा कलेच्या दृष्टीने मागासलेला आहे. अशा ग्रामीण भागातील लोकांना कला म्हणजे फक्त छंद नसून, ते उदरनिर्वाहाचे साधन होऊ शकते, हे पटवून दिले पाहिजे.

कला क्षेत्रात इतर क्षेत्रांप्रमाणेच पैसे कमवता येतात किंबहुना त्याहून अधिक पैसे या क्षेत्रात मिळवणे शक्य आहे. हे समजून घेतले पाहिजे की, पाश्‍चात्य देशात चित्रे तारण ठेवून बँकेमधून पैसे मिळतात. आपल्या भारतामध्ये अशी अनेक कलादालने (Art Gallery's) आहेत. त्यामध्ये खूप मोठ्या किमतींना चित्राची विक्री होते. हे सर्व ग्रामीण भागातील लोकांना पटवून देण्यासाठी व कलेच्या दृष्टीने मागासलेला ग्रामीण समाज यांना कलेचा प्रकाश बघता यावा, या दूरदृष्टीकोनातून स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या प्रयत्नाने व चित्रकार - शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के यांच्या अथक परिश्रमांनी सावर्डे येथे कोकणातील अग्रगण्य सह्याद्री स्कूल ऑफ आर्टची स्थापना १८ जून १९९३ साली करण्यात आली. आजपर्यंत या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आज या कला महाविद्यालयाला २९ वर्षे पूर्ण होऊन ही कलेची वाटचाल अशीच अविरतपणे सुरू आहे. या कला महाविद्यालयात महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातून अनेक भागांतून कला विद्यार्थी कलेचे धडे घेण्यासाठी येतात. या कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर तसेच जागतिक पातळीवर सन्मान प्राप्त करून कला महाविद्यालयाची मान उंचावली आहे.

- विक्रांत बाेथरे, सह्याद्री आर्ट ऑफ काॅलेज, सावर्डे, चिपळूण

Web Title: The real nature of art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.