माळीणच्या धर्तीवर तिवरे धरणग्रस्तांचे पुनर्वसन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 05:37 AM2019-08-02T05:37:05+5:302019-08-02T05:37:10+5:30
तिवरे धरण फुटून २२ लोकांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत ९ कोटींपेक्षाही अधिक नुकसान झाले
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरणफुटीला शुक्रवारी एक महिना पूर्ण होत आहे. धरण फुटल्यामुळे ज्यांचे नुकसान झाले, त्यांच्यापर्यंत वस्तूंसह सर्व प्रकारची मदत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ६ लाख रूपये देण्यात आली. त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, माळीणप्रमाणेच येथील पीडितांना घरे बांधून
दिली जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
तिवरे धरण फुटून २२ लोकांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत ९ कोटींपेक्षाही अधिक नुकसान झाले. माळीण पीडितांना ४00 ते ४१५ चौरस फुटांची घरे बांधून दिली आहेत. तशाच पद्धतीने धरणग्रस्तांचे पुनर्वसन केले जाईल. १३ घरे या दुर्घटनेत वाहून गेली. मात्र ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर घरांचे पोटभाग लक्षात घेऊन ४६ घरे नव्याने बांधली जाणार आहेत. आराखडा जलसंपदा खात्याला तसेच सिद्धीविनायक ट्रस्टला सादर केला जाणार आहे. हा आराखडा पाठवल्यानंतर ट्रस्टकडून पाच कोटी रूपये दिले जाणार आहेत. म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.