काँग्रेसवरील टीकेचा पश्चात्ताप; भाजपा म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा- आमदार भास्कर जाधव बरसले!
By मनोज मुळ्ये | Published: January 21, 2024 02:17 PM2024-01-21T14:17:16+5:302024-01-21T14:18:04+5:30
सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत आमदार राजन साळवी यांना भेटण्यासाठी आमदार जाधव रत्नागिरीत आले होते
मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: आयुष्यभर काँग्रेसच्या विरोधात टीका करत राहिलो. त्याबद्दल आता पश्चात्ताप होतोय. कारण त्यांनी कधीही विरोधक म्हणून आमच्यावर कारवाया केल्या नाहीत. मात्र ज्यांच्यासोबत आम्ही पूर्वी होतो, ती भाजपा केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर विविध यंत्रणांचा वापर करुन आमची चौकशी लावत आहे. याचसाठी आम्ही भाजपा वाढवली का, असा प्रश्न करत आमदार भास्कर जाधव यांनी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी म्हण सांगत भाजपावर कडाडून टीका केली. सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत आमदार राजन साळवी यांना भेटण्यासाठी आमदार जाधव रत्नागिरीत आले होते. सत्तेच्या माजाला लोकच उत्तर देतील. जनता सगळे पाहत आहे. लोकच त्यांना उत्तर देतील, असेही आमदार जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आमचा जो छळ केला जात आहे, तो लोकांनाही कळत आहे. त्यामुळे लोकच त्यांना उत्तर देतील आणि त्यात आम्ही समाधान मानू, असेही ते म्हणाले.
आमदार राजन साळवी आणि त्यांच्या भावाने चरितार्थासाठी उद्योग, व्यवसाय करुच नये का? इतकी वर्षे ते व्यवसायात आहेतच. ही लोकशाही आहे ना? मग अशा पद्धतीने कारवाई कशासाठी, असा प्रश्न त्यांनी केला. राष्ट्रवादीतून सत्तेत गेलेल्या लोकांपैकी अनेकांना ईडी, लाचलुचपत, आयकर अशा वेगवेगळ्या यंत्रणांकडून नोटीस गेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या अनेक आमदारांना अशा नोटीस आधी गेल्या आहेत. आता ते तिकडे (भाजपासोबत) गेल्यानंतर त्याचे काय झाले? रक्षाबंधन झाले का? त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर केलेला दहशतीचा आरोप खरा आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यांमध्येही हेच सुरू आहे, असा आरोप त्यांनी भाजपावर केला.
उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात जाणार आहेत. त्याला भाजपाकडून विरोध केला जात आहे. त्याबाबत बोलतानाही त्यांनी भाजपावर टीकेचे आसूड ओढले. कोण आहे ही भाजपा? उद्धव ठाकरे येऊन गेल्यानंतर मंदिरात गोमुत्र शिंपडण्याची भाषा त्यांच्या एका आमदाराने केली आहे. ज्यांची बुद्धीच गोमुत्रापुरेशीच आहे, त्यांच्याकडून सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही. त्यांनी गोमुत्र शिंपडण्यापेक्षा गोमुत्र प्यावे, असेही ते म्हणाले. अयोध्येतील राममंदिर सर्वोच्च न्यायालय. राम मंदिर न्यासामुळे होत आहे. पण काही पक्षांना असे वाटत आहे की आपण प्रभू रामचंद्रांच्या नावाने राजकारण करु. पण ते शक्य होणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
... तर माझा पक्ष सरकारसोबत
मनोज जरांगेपाटील यांच्या मुंबईत होणाऱ्या आंदोलनाबाबत बोलताना आमदार जाधव म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सरकारने वेळीच निर्णय घ्यावा. त्यासाठी मराठा बांधवांना मुंबईत येऊन आंदोलन करण्याची वेळ येऊच देऊ नये. असा निर्णय सरकार घेणार असेल, तर माझा पक्ष सरकारसोबत असेल.
समाजविरुद्ध समाज लढवायचा आहे का?
केंद्र सरकारने इडब्ल्यूएसमधून १० टक्के आरक्षण वाढवले तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघू शकतो. मात्र केंद्र सरकारला हा निर्णय घ्यायचा आहे, असे वाटत नाही. त्यांना फक्त समाजविरुद्ध समाज लढवायचा आहे की काय? सरकारच्या भूमिकेबद्दल शंका निर्माण होत आहे, अशी टीकाही त्यांनी त्यांनी केली.