फोटो ३० नाकाडे फोल्डरमध्ये सेव्ह आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा हा संस्कारी, संयमी आणि चांगल्या सुसंस्कृत माणसांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दुर्दैवाने मागील काही दिवसांपासून या जिल्ह्याचे संस्कार कुठे गेले असे वाटू लागले आहे. २४ तास सेवा देणाऱ्या वीज कामगाराचा सन्मान ठेवत समजविघातक प्रवृत्तींना वेळीच आवर घालण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन तांत्रिक कामगार संघटनेचे महेंद्र शिवलकर यांनी केले आहे.
कोरोनाकाळात बाधित क्षेत्रातही स्वत:चा जीव धोक्यात घालून वीज पुरवणाऱ्या, निसर्ग चक्रीवादळात तातडीने धावून वीजपुरवठा सुरू करणाऱ्या वीज कामगारांवर ग्राहक थकीत रक्कम मागितल्यावर मारहाण करत आहेत, शिव्या देत आहेत, ही गोष्ट अतिशय खेदजनक आहे.
रत्नागिरी, चिपळूण आणि राजापूर येथील मारहाणीच्या घटनांचा निषेध तांत्रिक कामगार संघटनेतर्फे शिवलकर यांनी केला आहे. विजेचे दर ठरविणे अथवा अन्य कुठल्याही बाबी वीज कामगार नियंत्रित करू शकत नाही. त्यामुळे २४ तास सेवा देणाऱ्या वीज कामगारांचा सन्मान ठेवत समाजविघातक प्रवृत्तींना आवर घालावा, असेही शिवलकर यांनी स्पष्ट केले आहे.