रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात विश्रांतीगृह, नियोजनच्या बैठकीत अंदाजपत्रकाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:25 AM2019-01-01T10:25:59+5:302019-01-01T10:27:43+5:30
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी जागाच नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेऊन आमदार राजन साळवी यांनी राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे.
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी जागाच नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेऊन आमदार राजन साळवी यांनी राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे. जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये विश्रांतीगृहासाठी ६५ लाखाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. आमदार साळवी यांच्या मागणीनुसार तातडीने पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नाविन्यपूर्ण योजनेमधून या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.
संपूर्ण जिल्ह्यातून जिल्हा रूग्णालयात रूग्णांसोबत येणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना मुक्काम करण्यासाठी किंवा काही काळ प्रतीक्षा करण्यासाठी खूप हाल सहन करावे लागतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आधार घ्यावे लागतात. जिल्हा रूग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाचे नातेवाईक रत्नागिरी येथे असतातच असे नाही.
त्यामुळे त्यांना आपल्या निवाऱ्यासाठी मोठी परवड सहन करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन आमदार राजन साळवी यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेऊन जिल्हा रूग्णालयाच्या आवारामध्ये रूग्णांच्या नातेवाईकांसाठी विश्रांतीगृह बांधण्याची मागणी केली होती.
त्यानंतर आमदार साळवी यांनी मागील जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये पालकमंत्री वायकर यांच्याकडे मागणी केली होती. वायकर यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मागील जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या आवारामध्ये रूग्णांच्या नातेवाइकांसाठी विश्रांतीगृह उभारण्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर आमदार साळवी यांनी अंदाजपत्रक तयार होण्यासाठी सतत पाठपुरावा केला.
दिनांक २९ डिसेंबर रोजी झालेल्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये यासाठी ६५ लाखाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. या अंदाजपत्रकाला मंजुरी दिल्यामुळे आता नातेवाईकांसाठी विश्रांतीगृह उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.