रिक्षाची कठड्याला धडक : दोन ठार
By Admin | Published: May 7, 2017 11:43 PM2017-05-07T23:43:32+5:302017-05-07T23:43:32+5:30
रिक्षाची कठड्याला धडक : दोन ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शहरातील माळनाका परिसरात उभारण्यात येत असलेल्या स्कायवॉकच्या खांबाला रिक्षाची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाले़, तर तिघेजण गंभीर जखमी झाले़ रिक्षाचालक ईश्वर दशरथ दोडामणी व सहप्रवासी अशोक लक्ष्मण चव्हाण अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.ही घटना रविवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली.
संतोष जनार्दन विसपुते (पोलीस वसाहत, रत्नागिरी) हे रत्नागिरी कारागृहात कार्यरत आहेत़ ते आपल्या कामानिमित्त नाशिक येथे गेले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ते रत्नागिरी रेल्वे स्थानकात आले. तेथून ते रिक्षाने (एमएच-०८-के-३८७२) एस.टी. स्टॅण्डच्या दिशेने येण्यासाठी निघाले. अशोक चव्हाण, संतोष विसपुते यांच्यासह दक्षिता व वैभवी या दोन मुली रिक्षातून प्रवास करत होत्या.
रिक्षाचालक ईश्वर दोडामणी याने रिक्षा भरधाव वेगाने शहराच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली़ त्याची रिक्षा पहाटे ४़१५ वाजण्याच्या सुमारास माळनाका परिसरात आली असता त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि रिक्षा स्कायवॉकच्या खांबाला जोरदार धडकली.
अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा चेंदामेंदा झाला. रिक्षाचालक दोडामणी व अशोक चव्हाण हे जागीच ठार झाले़ संतोष विसपुते व दोन मुली गंभीर जखमी झाल्या. जखमी संतोष विसपुते, दक्षिता व वैभवी या तिघांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.