प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरींकोकण रेल्वे मार्गाला जोडणाऱ्या मध्य रेल्वेच्या पनवेल ते रोहा या ७५ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. आता रोहा ते दासगाव (महाड) या ४६ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण काम वेगात सुरू आहे. ३५० कोटी रुपये खर्चाचे हे काम २०१८ अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे. येत्या चार ते पाच वर्षात मार्गाचे दुपदरीकरण गोव्यापर्यंत होण्याची शक्यता असून, त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांच्या संख्येत वाढ होईल. कोकणवासीयांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने ४० वर्षांपूर्वी पनवेल ते रोहा रेल्वे मार्ग उभारला. मात्र, या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात मध्य रेल्वेने प्रचंड दुर्लक्ष केले. त्यामुळे चार दशके हा मार्ग एकेरीवर राहिला होता. कोकण रेल्वे १९९७ला सुरू झाल्यानंतर पनवेल ते रोहा मार्गाच्या दुपदरीकरणाचे वारे सुरू झाले. त्यानंतरही दुपदरीकरणाचे काम तब्बल दहा वर्षांनंतर कार्यवाहीत येईल, असे चित्र निर्माण झाले. २००९ ते २०११ या काळात पनवेल - रोहा मार्गाचे दुपदरीकरण होणार होते. त्यासाठी या ७५ किलोमीटर मार्गाचे पनवेल-पेण ३५ किलोमीटर, तर पेण - रोहा ४० किलोमीटर असे दोन टप्पे करण्यात आले होेते. मात्र, त्यातही हेळसांड झाली. अखेर मार्च २०१७मध्ये या मार्गाचे दुपदरीकरण काम एकदाचे पूर्ण झाले आहे. केंद्रात कोकणातील सुरेश प्रभू हे रेल्वे मंत्री झाल्यानंतर कोकण रेल्वेची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत तर अनेक कामांना गती मिळाली आहे. मध्य रेल्वेकडून पनवेल-रोहा रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याआधीच रोहा-दासगाव (महाड) या कोकण रेल्वेच्या मार्गाचे दुपदरीकरण काम नोव्हेंबर २०१६मध्येच सुरू करण्यात आले आहे. हे काम सध्या वेगाने सुरू आहे. त्यामुळे डिसेंबर २०१८ या नियोजित वेळेपर्यत हे काम पूर्ण होणार आहे. कोकण रेल्वेचा प्रकल्प उभारण्यासाठी तत्कालिन अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते यांच्यासह रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस तसेच तत्कालिन पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यामुळेच आज कोकणातून रेल्वे धावते आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात कोकण रेल्वेला कोणीच वाली नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. २० वर्षांपूर्वी सुरू झालेला कोकण रेल्वे प्रकल्प मधल्या १५ वर्षांच्या काळात दुर्लक्षित राहिला. या मार्गाचा विकास झाला नाही. विकासाचा हा अनुशेष पूर्ण करण्यासाठी पुन्हा कोकणातील दुसरे मंत्री सुरेश प्रभू यांना पुढाकार घ्यावा लागला आहे. मोदी सरकारमध्ये रेल्वेमंत्री झाल्यानंतर सुरेश प्रभू यांनी कोकणच्या विकासाची संजीवनी ठरलेल्या कोकण रेल्वेला खऱ्या अर्थाने बळ दिले आहे. त्यामुळेच कोकण रेल्वे प्रकल्पातील असंख्य विकासकामे पूर्ण झाली आहेत व अनेक कामे सध्या सुरू आहेत. अनेक नवीन रेल्वे स्थानकेही कोकणात झाली असून, त्यांची कामे सुरू आहेत. प्रवाशांना गेल्या दोन वर्षांच्या काळात कोकण रेल्वेमध्ये अनेक आधुनिक सुविधाही मिळू लागल्या आहेत.
रोहा-दासगाव मार्गाचे दुपदरीकरण वेगात...
By admin | Published: May 03, 2017 11:30 PM