रत्नागिरीतील पाणीटंचाई रोखण्यासाठी पावणेसहा कोटी रुपये मंजूर, टंचाई आराखडा निम्म्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 06:26 PM2023-03-03T18:26:31+5:302023-03-03T18:26:53+5:30
केंद्र शासनाच्या हर घर जलसे नल या अभियानांतर्गत जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून ७०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली
रत्नागिरी : गाव, वाडी, वस्त्यांवर जलजीवन योजना राबवण्यात येत असल्याने त्याचा चांगला परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे पाणीटंचाई कृती आराखडा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे. अजूनही काही ३९५ वाड्यांना पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता असून, तेथील उपाययोजनांसाठी शासनाकडून ५ कोटी २२ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. टंचाई कृती आराखड्यातील विविध कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.
कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील २५७ गावातील ३९५ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. त्यासाठी ५ कोटी ७३ लाख रुपयांचा आराखडा जिल्हा परिषदेकडून शासनाला सादर करण्यात आला होता. हाच आराखडा गतवर्षी सुमारे १२ कोटी रुपयांचा होता. दरवर्षी डिसेंबर महिन्यात हा आराखडा तयार करुन तो प्रशासनाला सादर करण्यात येतो.
मात्र, यंदा तालुकास्तरीय आराखडे येण्यास विलंब झाला. त्यातही मंडणगड, खेड या तालुक्यातून आराखडा उशिरा आला. त्यामुळे जिल्ह्याचा आराखडा तयार करण्यास विलंब झाला. त्यानंतर हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी देण्यात आलेली आहे.
टंचाईवर मात करण्यासाठी या आराखड्यात जिल्हा परिषदेने काही कामे सुचवली आहेत. त्यात जिल्ह्यात २५५ नवीन विंधन विहिरी बांधण्यात येणार आहेत. नळ दुरुस्तीची १७ कामे करण्यात येणार असून, ३४ विहिरीतील गाळ उपसा करण्यात येणार आहे. टंचाईग्रस्तांसाठी तात्पुरत्या दोन पूरक नळपाणी पुरवठा योजना राबवण्यात येणार आहेत. तर संभाव्य ९९ गावातील २७९ वाड्यांना ३८ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी ७४ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात तब्बल ७०० कोटी रुपयांची कामे सुरू
केंद्र शासनाच्या हर घर जलसे नल या अभियानांतर्गत जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून ७०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे वाड्या, वस्त्यांवर पाणी पुरवठा योजना नेण्यात येत असल्याने ही कामे सुरु झाली आहेत. त्या परिणाम चांगला झाला असून, जिल्ह्यात पाणीटंचाईच्या आराखड्यामध्ये कपात झाली आहे.