देवरुख : संगमेश्वर ओकटेवाडी, संगमेश्वर कसबा हायस्कूल, नायरी-तिवरे या मार्गावर देवरुख आगारातून सुरु असलेल्या एस. टी. फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, या फेऱ्या सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे दुर्गम भागातील या एस. टी. फेऱ्या पूर्ववत सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची पायपीट थांबली आहे.
कोविड तपासणी
दापोली : हर्णै येथील व्यापाऱ्यांची आसूद आरोग्य केंद्रामार्फत नुकतीच कोविड तपासणी करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग कमी होताच लॉकडाऊनच्या काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. दुकाने उघडण्याआधीच व्यापाऱ्यांनी कोविड तपासणी करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार हर्णैतील १५५ व्यापाऱ्यांची कोविड तपासणी करण्यात आली.
पूरग्रस्त भागात स्वच्छता
आवाशी : कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण, खेड शहर आणि परिसरात महापूर आला. यामुळे अनेकांच्या घरातील सर्व साहित्य वाहून गेले. या परिसरात मोठ्या प्रमाणावर चिखल साचला होता. या भागात जाऊन आम्ही शिवभक्त परिवारातर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. परिवाराच्या सर्व सदस्यांनी यात सहभागी होऊन स्वच्छता केली.
एस. टी. बस सुरु
दापोली : तालुक्यातील बुरोंडी येथे जाणारा रस्ता खचल्यामुळे बंद करण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावरील बस वाहतूकही बंद होती. मात्र, वीस दिवसांनी पुन्हा ही बससेवा सुरु करण्यात आली आहे. या कालावधीत ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली होती. रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्याने पुन्हा बससेवा नियमित झाली आहे.
स्वाध्याय पुस्तिका वाटप
दापोली : आसूद येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील पाच शाळांना प्रशांत बिवलकर यांच्या माध्यमातून मोफत स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, या उद्देशाने या स्वाध्याय पुस्तिका वितरीत करण्यात आल्या. तसेच जयंत जोशी यांच्या स्मरणार्थ इंटरनेट तसेच डॉ. शिंदे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचा खर्च देण्यात आला.