चिपळूणमध्ये स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:32 AM2021-07-30T04:32:59+5:302021-07-30T04:32:59+5:30
राजापूर : चिपळूण येथील महापुराने जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे श्रमदानाची आवश्यकता असल्याने तालुक्यातील नाटे येथील ओम साई समर्थ ...
राजापूर : चिपळूण येथील महापुराने जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे श्रमदानाची आवश्यकता असल्याने तालुक्यातील नाटे येथील ओम साई समर्थ शैक्षणिक कला, क्रीडा संस्थेने २३ जणांची टीम तयार करुन चिपळूण येथे स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. तसेच या संस्थेकडून अनेकांना जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप करण्यात आले.
युवकांचा पुढाकार
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावातील युवकांनी स्वयंस्फूर्तीने २५ हजार रुपयांचा निधी गोळा केला आणि त्यातून चिपळूण शहरातील पूरग्रस्तांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप केले. देवेन वळामे, यश कोळवणकर, ओंकार शेट्ये या युवकांनी मित्रपरिवाराच्या सहकार्याने हा मदतनिधी उभारला.
वर्गखोल्या खचल्या
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील परशुराम बालविद्यालय, शाळा क्रमांक २ च्या वर्गखोल्या अल्पावधीतच खचल्याने मुख्य इमारतीची दुरवस्था झाली आहे. अतिवृष्टीमुळे या वर्गखोल्या खचल्या असून, स्लॅबलाही अनेक ठिकाणी गळती लागली आहे. शाळा सुरु झाल्यास मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन ग्रामस्थांमधून भीती व्यक्त होत आहे.
धरणाला गळती
देवरुख : तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी पाझर तलावाला भगदाड पडले आहे. सध्या अनेक ठिकाणी धरणांपासून धोका असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून भीती व्यक्त होत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी माहिती देताच महसूल, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तलावाजवळ जाऊन पाहणी केली.
मंडळातर्फे वृक्षारोपण
दापोली : किरांबावाडी विकास मंडळ, मुंबईतर्फे वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या मंडळाने ३२ प्रकारच्या एकूण ३०० झाडांचे रोपण केले. मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण पवार यांच्या हस्ते गावातील प्रत्येक घरामध्ये काजूच्या दोन रोपांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात विविध संस्थांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
डॉक्टरांची पथके येणार
रत्नागिरी : रायगड आणि रत्नागिरीतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई काँग्रेसच्यावतीने जिल्हावार मदत अभियान हाती घेण्यात आले आहे. पूरबाधितांना अन्नधान्याच्या सामुग्रीसह वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर या तालुक्यांमध्ये डॉक्टरांची पथके दाखल होणार आहेत.
ऑनलाईन योग शिबिर
दापोली : येथील रा. वि. बेलोसे एज्युकेशन फाऊंडेशन संचलित न. का. वराडकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने दहादिवसीय योग शिबीर ऑनलाईन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश निंबाळकर, प्रमुख पाहुणे डॉ. राहुल मराठे आदींनी मार्गदर्शन केले.
दरड कोसळली
खेड : तालुक्यातील घेरारसाळगड या किल्ल्याकडे जाणाऱ्या निमनीची वाडी व झापाडीदरम्यान दरड कोसळली आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कोट्यवधींचा खर्च करुन येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, मुसळधार पावसामुळे त्यावर दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
ग्रामस्थांनी केले श्रमदान
दापोली : तालुक्यातील पाडलेचे सरपंच रवींद्र सातनाक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खेड येथील नागरिकांच्या मदतीला धावून जात सहकार्याचा हात पुढे केला आहे. पुरात अडकलेल्या लोकांना पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी खेड येथे श्रमदान मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत गुरुदेव दत्त मंडळ, पाडलेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
तीन कोटींचे नुकसान
देवरुख : दि. २० ते २२ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका संगमेश्वर बाजारपेठेला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. बाजारपेठेतील दुकानांसह माभळे, लोवले या गावांमधील भातशेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुमारे ३ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज पंचनाम्यांतून पुढे आला आहे.
खड्डे त्रासदायक
रत्नागिरी : शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे पावसाळ्यात अधिकच रुंदावले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे ही एक कसोटीच ठरत आहे. त्यातच सध्या पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दिवसेंदिवस खड्डे वाढू लागले आहेत. नगर परिषदेकडून तात्पुरती डागडुजी सुरु करण्यात आली आहे.
पूरग्रस्तांना मदतीचा हात
रत्नागिरी : शहरानजीकच्या साखरतर येथील ग्रामस्थांकडूनही चिपळूणसाठी आर्थिक मदतीचे अनेक हात पुढे आले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येक मुस्लिम मोहल्ल्यातून मदत गोळा केली जात आहे. साखरतर गावातूनही चार गाड्यांसह तीन बोटी मदतीसाठी चिपळूण, खेड येथे पाठविण्यात आल्या होत्या. येथील ग्रामस्थांचे सतत तीन दिवस मदतकार्य सुरु होते.
परीक्षेच्या तारखेत बदल
रत्नागिरी : पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दि. ९ ऑगस्ट रोजी जाहीर झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये होणारी ही परीक्षा यावर्षी एप्रिलमध्ये होणार होती. त्यानंतर २३ मे ही तारीख निश्चित झाली होती. पुन्हा ही परीक्षा ८ ऑगस्टऐवजी ९ ऑगस्टला घेण्याचे निश्चित झाले आहे.
ग्रामस्थ धावले मदतीला
रत्नागिरी : चिपळूणमधील पूरग्रस्तांच्या मदतीला अनेक हात सरसावले आहेत. तालुक्यातील काळबादेवी आणि आरे येथील सुमारे २०० ग्रामस्थांनी चिपळूण येथे जात मदतीचे वाटप केले. जीवनावश्यक वस्तूंचे किट बनविण्यात आले असून, त्यात गहू, साखर, तांदूळ, साड्या, चादरी आदींचा समावेश आहे.
रस्ता खचल्याने धोका
गुहागर : गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने रौद्ररुप धारण करुन जिल्ह्याला झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे गुहागर तालुक्यातील भातगावमधील कदम एस. टी. स्टॉप ते वडाची वाडी या रस्त्याला तडे गेले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरुन वाहतूक करु नये, असे सूचना फलक ग्रामपंचायतीतर्फे लावण्यात आले आहेत.