सागरी मासेमारी ठप्प; २०० कोटींचे नुकसान- सागरी वाऱ्यांमुळे मच्छीमारी नौका बंदरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 11:55 AM2020-02-03T11:55:59+5:302020-02-03T11:58:49+5:30

समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका वाऱ्याचा वेग वाढल्याने मासेमारी न करताच माघारी फिरल्या असून, वारा कमी होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

Sea fishing jam; 2 crore loss | सागरी मासेमारी ठप्प; २०० कोटींचे नुकसान- सागरी वाऱ्यांमुळे मच्छीमारी नौका बंदरातच

सागरी मासेमारी ठप्प; २०० कोटींचे नुकसान- सागरी वाऱ्यांमुळे मच्छीमारी नौका बंदरातच

Next
ठळक मुद्देनिसर्गाच्या अवकृपेने जिल्ह्यातील सागरी मासेमारीचे करोडोंचे नुकसान, भरपाई नाहीच.संपलेल्या ६ महिन्यांच्या हंगामातील ४ महिने सागरी मासेमारी ठप्पच.हंगामातील महा, क्यार यासारख्या चार वादळांनी सागरी मासेमारीचे कंबरडेच मोडले परकीय चलनातही मोठी घट.

रत्नागिरी : पावसाळ्यानंतर सुरू झालेल्या सागरी मासेमारी व्यवसायाला गेल्या ६ महिन्यांपासून संकटांच्या गर्तेतून जावे लागत आहे. गेल्या पंधरवड्यापासून सातत्याने सागरी वारे वाहू लागल्याने सागरातील मासेमारी ठप्प झाली आहे. गजबजलेल्या मिरकरवाडा व अन्य मासेमारी बंदरांमध्ये मासेमारी नौका नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. सहा महिन्यांच्या संपलेल्या हंगामात मासेमारी व्यवसायाचे सुमारे २०० कोटींचे नुकसान झाले आहे.

दिनांक १ जून ते ३१ जुलै २०१९ या दोन महिन्यांच्या काळात पावसाळी मासेमारीला बंदी होती. १ ऑगस्ट २०१९पासून पारंपरिक तर १ सप्टेंबर २०१९पासून पर्ससीन मासेमारी सुरू झाली. मात्र, निसर्गाची अवकृपा सातत्याने सागरी मासेमारीच्या मुळावर आली. ऑगस्ट महिन्यात पावसामुळे संपूर्ण महिना मासेमारी होऊ शकली नाही. १ सप्टेंबर २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या पाच महिन्यांच्या काळात तुफानी वारे, अतिवृष्टी यामुळे सागरी मासेमारी ३ महिन्यांपेक्षा अधिक काळ ठप्प होती. त्यामुळे संपलेल्या सहा महिन्यातील एकूण ४ महिने मासेमारी हंगाम चाललाच नाही.

दिनांक ३१ डिसेंबर २०१९ला पर्ससीन मासेमारीचा चार महिन्यांचा हंगामही संपुष्टात आला. आधीच चार महिने हंगाम असताना तोही हातातून गेल्याने पर्ससीन मासेमारीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मत्स्योत्पादनात या हंगामात मोठी घट झाली आहे. पर्ससीन मासेमारी १ जानेवारी २०२०पासून बंद झालेली असली तरी पारंपरिक मासेमारी सुरू आहे. मात्र, जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात काही बेकायदा पर्ससीन, मिनी पर्ससीन, परराज्यातील घुसखोर मासेमारी नौका तसेच एलईडी मासेमारीचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यातही मासळीच येत नसल्याचे पारंपरिक मच्छिमारांचे म्हणणे आहे.

समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका वाऱ्याचा वेग वाढल्याने मासेमारी न करताच माघारी फिरल्या असून, वारा कमी होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून या नौका बंदरांमध्ये नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. मासेमारीवरील संकटांमुळे पर्ससीन मासेमारी, पारंपरिक मच्छीमारी प्रकारांमधील रापण, होडीतून वल्हवून मासेमारी करणारे तियानीवाले, आऊटबोर्ड इंजिनच्या सहाय्याने होणारी गिलनेट मासेमारी, बलावाद्वारे होणारी मासेमारी तसेच मच्छी विक्रेत्या महिला, मासळी वाहतूक करणारे हातगाडी-रिक्षा टेम्पो, बर्फ कारखानदार, मच्छीमारी सहकारी संस्था, मासेमारीचे साहित्य विकणारे, मासळी एजंट, हॉटेल्स, पर्यटन व्यावसायिक यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

यंदाच्या हंगामात सागरी मासेमारीला ग्रहण लागले आहे. जिल्ह्याच्या बाजारपेठेतील उलाढालीवरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. मच्छिमारांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने जिल्ह्यात मत्स्यदुष्काळ जाहीर करावा व मच्छिमारांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यातील सागरी मासेमारी ठप्प झाल्याने, ४ महिने हंगाम वाया गेल्याने मच्छिमारांचे संपलेल्या हंगामामध्ये सुमारे २०० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. मासेमारी व्यवसायातून शासनाला करोडोंचे परकीय चलन मिळते. परंतु, यावेळी परकीय चलनात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यावरून मच्छिमारांचे किती नुकसान झाले, याचा अंदाज शासनालाही घेता येईल, असे मच्छीमार नेते नदीम सोलकर म्हणाले.

मत्स्यदुष्काळ जाहीर करा
सागरी मासेमारीवर सातत्याने गेल्या सहा महिन्यांच्या हंगामात संकटे आली. हंगामात चारवेळा महा, क्यारसारखी वादळे झाली. अवकाळी पावसाने शेतीचे, मासेमारीचे करोडोंचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना काही प्रमाणात शासनाची मदत मिळाली. मात्र, मच्छिमारांना प्रचंड नुकसान होऊनही मदत मिळालेली नाही, असे मच्छीमार नेते नदीम सोलकर यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले.

Web Title: Sea fishing jam; 2 crore loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.