कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 02:32 PM2021-04-16T14:32:21+5:302021-04-16T14:34:09+5:30
CoronaVIrus Ratnagiri : प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. वर्षभराच्या कालावधीत ४१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला असून, एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात अडीच हजार अधिक रुग्ण सापडले असून, १५ दिवसांत तब्बल ३९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रहिम दलाल
रत्नागिरी : प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. वर्षभराच्या कालावधीत ४१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला असून, एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात अडीच हजार अधिक रुग्ण सापडले असून, १५ दिवसांत तब्बल ३९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पन्नाशीच्या वरील वयाच्या रुग्णांचा अधिक समावेश आहे. दुबईहून शृंगारतळी (ता. गुहागर) येथे आलेली व्यक्ती १८ मार्च, २०२० रोजी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. हा रुग्ण जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण ठरला होता. खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालयात ८ एप्रिल, २०२० रोजी कोरोना रुग्णाने अखेरचा श्वास घेतला होता. तो रुग्ण जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरला असून, तो अलसुरे (ता. खेड) गावातील होता.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला असून, या निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. एप्रिल महिन्यामध्ये तर कोरोनाचा कहर वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरांसह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा प्रसार सुरू झाला आहे.
एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ज्यांना कोणतीच लक्षणे नाहीत, अशा लोकांकडून कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत आहे. एप्रिलच्या १५ दिवसांत जिल्ह्यात २,५९२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले असून कोरोनाबाधितांची संख्या १३,६२१ झाली आहे. आतापर्यंत १०,०१५ रुग्ण बरे झाले आहेत. मृतांची संख्या आता ४१५ झाली असून त्यांचे प्रमाण ३.४ टक्के आहे.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याआधी रत्नागिरी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात १३० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबरमध्ये ५२ रुग्ण दगावले. मात्र त्यानंतर मृतांच्या संख्येत चांगली घट झाली. नोव्हेंबर २०२० पासून मार्च २०२१ पर्यंत हे प्रमाण मर्यादित होते. मात्र एप्रिल महिन्यात हे प्रमाण खूपच वाढले आहे. सध्यातरी लसीकरणाचा वेग वाढवणे हाच त्यावरचा उपाय मानला जात आहे.
लसीकरण कमी
लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तरी त्यातून धोका खूप कमी होतो. मात्र अजूनही लसीकरणाची गती वाढलेली नाही. त्यामुळे मृतांच्या संख्येवर अजून मर्यादा आलेली नाही. हीच बाब आरोग्य विभागासाठी अधिक चिंतेची आहे.