लॉकडाऊनमध्ये वाढ
रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी गावात कोरोनाची रुग्णसंख्या अचानक वाढल्याने ग्रामस्थ चिंतीत झाले आहेत. रुग्णसंख्या कमी न झाल्याने ग्रामस्थांनी गावात आठ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी पुन्हा आठ दिवसांनी लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे.
जीवनावश्यक वस्तूंची मदत
दापोली : तालुक्यातील मुरुड येथील एन. के. वराडकर हायस्कूलमध्ये ११३ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे मुरुड कर्दे व आसूद गावातील २० गरजू विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष अमृत बांद्रे, उपाध्यक्ष विरेंद्र भुवड, सचिव ऋतुराज इंदुलकर उपस्थित होते.
देवडेत गाळउपसा
देवरुख : नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने व ग्रुप ग्रामपंचायत, देवडेवाडी आणि बालविकास मंडळ (चिंचवळकर वाडी) यांच्या माध्यमातून देवडे गावातून उगम झालेल्या काजळी नदीचा गाळउपसा करण्याचे काम गेले दोन महिने सुरु होते. ७०० मीटर लांब व ८० मीटर रुंद आणि २ मीटर खोल गाळ काढण्यात आला आहे.
संदेश झेपले यांचे यश
देवरुख : शहरातील देवरुख क्रमांक ४ शाळेचे शिक्षक व पूर गावचे रहिवासी संदेश झेपले यांनी रत्नागिरी जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. ही स्पर्धा ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती.
खड्डे बुजविण्याचे काम सुरु
चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील भोस्ते घाटाच्या पायथ्याशी वेरळ येथे खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाले आहे. पावसाळा तोंडावर असल्याने घाईगडबडीने ठेकेदाराकडून खड्डे बुजविण्यात येत आहेत. पॅचवर्क पद्धतीने डांबरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा रस्ते उखडण्याचा धोका आहे.
बाजारपेठेत शुकशुकाट
दापोली : तालुक्यातील हर्णै बाजारपेठ व बंदरात लॉकडाऊनमुळे शुकशुकाट पसरला होता. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हाभर लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे बाजारात एकही व्यक्ती फिरकत नसल्याचे निदर्शनास आले आहे. पोलीस बंदोबस्त सर्वत्र कडक ठेवण्यात आला आहे.
आरक्षणाची मागणी
रत्नागिरी : सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याच्या सूचना राज्य शासनाला दिल्याने पदोन्नतीमधील आरक्षण हा सर्व मागासवर्गीयांचा हक्क आहे. त्यामुळे पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य शासनाने त्वरित घ्यावा, यासाठी १ जून ते ७ जूनपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आंदोलन सुरु आहे.