खेर्डी शाळेची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:07 AM2021-07-13T04:07:35+5:302021-07-13T04:07:35+5:30
चिपळूण : गेल्या काही वर्षात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. यावर उपाययोजना म्हणून तालुकास्तरावर मॉडेल स्कूल ...
चिपळूण : गेल्या काही वर्षात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. यावर उपाययोजना म्हणून तालुकास्तरावर मॉडेल स्कूल उभारण्यात येत आहे. या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. त्यादृष्टीने भौतिक आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. यासाठी खेर्डी शाळा क्रमांक १ ची निवड करण्यात आली आहे.
पोस्टमास्तर सेवानिवृत्त
खेड : तालुक्यातील पन्हाळजे येथील डाकघर कार्यालयाच्या पोस्टमास्तर शरीफा खान नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. पन्हाळजे येथील कार्यालयात त्या १९९३मध्ये पोस्टमास्तर म्हणून रुजू झाल्या. २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्या निवृत्त झाल्या. त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
सोशल मीडियावर फसवणूक
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फसवणुकीचे प्रकार वाढू लागले आहेत. बनावट खाती काढून अनेकांची फसवणूक केली जात आहे. पोलीस विभागाकडून सायबर गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून जनजागृतीही करण्यात येत आहे. तरीही फसवणुकीचे प्रकार सुरुच आहेत.
करमरकर यांचा सत्कार
दापोली : दापोली तालुक्यातील जालगाव येथील सेवाभावी वृत्तीचे डॉ. प्रसाद करमरकर यांचा जालगाव कुंभारवाडीतर्फे सत्कार करण्यात आला. डॉ. करमरकर यांनी कोरोना काळातही आपल्या पेशाची जबाबदारी ओळखून कुुंभारवाडीसारख्या दाट लोकवस्तीच्या मोलमजुरी करणाऱ्या ग्रामस्थांना नित्य सेवा दिली आहे. या सेवेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
वातावरणात गारठा
रत्नागिरी : गेले दोन दिवस सलग पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला आहे. सलग पाऊस पडत असल्याने जिल्ह्याला दिलासा मिळत आहे. पाऊस सुरु असताना गारवा पडत असला तरीही पाऊस थोडासाही कमी झाला तरी पुन्हा उकाड्याला सुरुवात होते.
निर्बंध कधी उठणार?
रत्नागिरी : जिल्ह्यात काहीअंशी कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत. मात्र, जिल्हा अजूनही चौथ्या स्तरात गणला जात असून, त्यानुसार निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आता रुग्ण कमी झाल्याने जिल्हा प्रशासनानेही तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू करावेत आणि गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या व्यवसायांना सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हे व्यावसायिक करत आहेत.
शेतकरी सुखावला
देवरुख : गेल्या दहा ते बारा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने तालुक्यातील शेतीची कामे ठप्प झाली होती. परंतु, शुक्रवारपासून पुन्हा तालुक्यात पावसाचे उत्साहात कमबॅक झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शिल्लक राहिलेल्या लावणीच्या कामाला वेगाने सुरुवात केली आहे. शेतीची कामे उरकल्यामुळे आता शेतकरी सुखावला आहे.
रस्त्याची दुरवस्था
गुहागर : तालुक्यातील वरवेली येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यावर्षी रस्त्यालगतची गटारे स्वच्छ करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे गटारातील पाणी पूर्णपणे रस्त्यावर आले असून, रस्ता चिखलमय झाला आहे. या रस्त्यावर अनेक खड्डेही पडले आहेत. त्यातच दुतर्फा झाडी वाढल्याने अपघातांचा धोकाही वाढला आहे.
महागाई वाढली
रत्नागिरी : सर्वत्र कोरोनाचे महासंकट आहे. यात कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे व्यवसाय थांबले. परंतु, इंधनाचे दर भरमसाठ वाढू लागले आहेत. त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर होत आहे. अन्नधान्ये, फळे यांचे दर वाहतूक दर वाढल्याने दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. त्यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे.
जनावरांची वाहतूक
देवरुख : गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील अनेक भागातून अवैध जनावरांची वाहतूक होत आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात. मात्र, थोड्याच दिवसात त्यांना सोडून देत असल्याने अशा लोकांवर कारवाईची जरब बसत नाही. परत तेच लोक जनावरांच्या वाहतुकीत सक्रिय होत आहेत.