न्यायालयीन कोठडीतील संशयित गंभीर, वडिलांचा आरोप, गृहमंत्र्यांकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 05:15 PM2021-03-06T17:15:57+5:302021-03-06T17:21:24+5:30
Crimenews Ratnagiri Police- खेर्डी येथील वेश्या व्यवसाय प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला अश्रफ हुसेन चौगुले याची प्रकृती गंभीर बनल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. त्याची प्रकृती अधिक खालावत असून, त्याच्यावर योग्य उपचार होत नाहीत. पोलीस कोठडीत त्याला जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. याबाबत त्याच्या वडिलांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे दाद मागितली आहे.
चिपळूण : खेर्डी येथील वेश्या व्यवसाय प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला अश्रफ हुसेन चौगुले याची प्रकृती गंभीर बनल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. त्याची प्रकृती अधिक खालावत असून, त्याच्यावर योग्य उपचार होत नाहीत. पोलीस कोठडीत त्याला जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. याबाबत त्याच्या वडिलांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे दाद मागितली आहे.
याबाबत संशयित आरोपी अश्रफ चौगुले यांचे वडील हुसेन हारून चौगुले यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना तीन पानांचे पत्र पाठवून या प्रकरणातील माहिती दिली आहे. चिपळूण - खेर्डी येथील वेश्या व्यवसाय प्रकरणात अश्रफ याला चिपळूण पोलिसांनी २८ नोव्हेंबर २०२० रोजी अटक करून गुन्हा दाखल केला. त्यावेळी त्याची तब्बेत खणखणीत होती. त्याला कोणताही आजार नव्हता. त्याला या प्रकरणात ६ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आणि नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.
१५ दिवसांनी त्याची तब्येत खालावली आणि त्याला प्रथम उलट्या होऊ लागल्या. त्याची भेट घेतली असता, त्याची प्रकृती खालावली होती. शौचावाटे प्रचंड रक्तस्त्राव होत असल्याचे आणि उलट्या होत असल्याचे त्याने सांगितले. याबाबत नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांना माहिती देऊन तत्काळ उपचार करण्याची विनंतीही केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
न्यायालयाच्या परवानगीने त्याच्यावर ६ फेब्रुवारी रोजी प्रथम कामथे रुग्णालयात नंतर १० फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्हा रुग्णालय आणि परत ११ फेब्रुवारी रोजी कामथे रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु, त्याच्या आजाराची योग्य तपासणी झालीच नसल्याचे म्हटले आहे. अखेर प्रकृती गंभीर बनल्यानंतर मुंबईला हलविण्याचा सल्ला देण्यात आला.
त्याला मुंबई येथील सायन रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी ८ दिवस उपचारही झाले. अश्रफ हा कोठडीतील आरोपी असल्याने त्याला जे. जे रुग्णालयामध्ये दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दिनांक १ मार्च रोजी जे. जे. रुग्णालयामध्ये दाखल केले. परंतु, तो आरोपी असल्याने चक्क दाखल करण्यास नकार देण्यात आल्याचे हुसेन चौगुले यांनी म्हटले आहे.
साहेब, मुलाला वाचवा
हुसेन चौगुले यांनी गृहमंत्र्यांना आर्त साद घातली आहे. आमच्या कुटुंबातील तो एकमेव कमवता आहे. त्याच्यावरच आमचे सर्व कुटुंब अवलंबून आहे. त्याला एक अपंग मुलगाही असल्याचे म्हटले आहे. साहेब, माझ्या मुलाला वाचवा. किमान त्याच्यावर योग्य उपचार व्हावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.