देवरुख : भाजपने चार तुकडे फेकले म्हणून हे पळून गेले. तुम्हाला जे हवे होते, ते उद्धव ठाकरेंकडे मागायला पाहिजे होते. त्यांनी दिलदारपणाने तुम्हाला दिले असते. या मिन्धेसाठी काय कमी केले होते ? दुसऱ्याच्या चाकरीसाठी जे जातात, त्यांची कीव करावी वाटते. आपली हक्काची जागा सोडून तुकड्यासाठी त्यांनी गुलामगिरी पत्करली. मात्र, हा खेळ जास्त दिवस टिकणारा नाही. आता गेलेले वैभव परत कसे मिळवायचे त्याकडे जास्त लक्ष देऊया. ‘आता रडायचं नाही, लढायचं ते जिंकण्यासाठीच’ असे प्रतिपादन शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी देवरुख येथे केले.उद्धव ठाकरे शिवसेनेच्या संगमेश्वर तालुक्याच्या शिवगर्जना अभियानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिवसेनेला संघर्ष करणे नवीन नाही. गेलेले वैभव पुन्हा मिळवण्यासाठी संघर्ष करू. हक्काचा धनुष्यबाण मिळत नाही, तोपर्यंत शांत बसायचे नाही. आपले ऐश्वर्य परत मिळवू. गद्दारी करून जे गेलेत त्यांचा अंत अटळच आहे.प्रस्तावनेत माजी आ. सुभाष बने म्हणाले की, जे आमचे नव्हते, ते निघून गेले. त्यांची मजुरी संपली. आता मशाल घेऊन पुढे जायचे आहे. निष्ठावंत शिवसैनिक कुठेही गेलेला नाही.माजी राज्यमंत्री रवींद्र माने म्हणाले की, आपण निर्धाराने एकत्र आलो आहोत. त्यांना गाडून टाकल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही. ‘उषः काल होता होता, काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ या ओळी म्हणत पुन्हा मशाली पेटवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. अनाजीपंतांच्या नादी लागून उद्धव ठाकरे यांचे राज्य सत्तेवरून खाली खेचणाऱ्या गद्दारांना गाडून सूड घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा विश्वास जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी व्यक्त केला.शिवगर्जना यात्रा कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळी, महानगरपालिकेतील तृष्णा विश्वासराव, माजीमंत्री रवींद्र माने, माजी आ. सुभाष बने, समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंर्पकप्रमुख राजेंद्र महाडीक, रत्नागिरी सिंधुदुर्ग महिला संपर्कप्रमुख नेहा माने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, रचना महाडिक, मुंबईचे नगरसेवक उमेश माने, महिला संघटक वेदा फडके, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, रजनी चिंगळे, नंदादीप बोरकर, सुजित महाडिक, युवासेनेचे मुन्ना थरवळ उपस्थित होते.
आता रडायचं नाही, लढायचं ते जिंकण्यासाठीच, शिवसेना नेते सुभाष देसाई यांची शिवगर्जना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 6:19 PM