वातावरणातील बदल फळ पिकांच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 01:03 PM2020-02-06T13:03:18+5:302020-02-06T13:09:43+5:30
लांबलेला पाऊस, हवामानातील सातत्यपूर्ण बदल आणि ह्यक्यारह्ण तसेच ह्यमाहाह्ण वादळ यामुळे पिकांवर परिणाम झाला आहे. यावर्षीचा आंबा हंगाम नियमित हंगामापेक्षा उशिरा होणार आहे. काजूवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शिवाय वाल, कुळीथ, पावटा या पिकांची उत्पादकता घटली आहे. चिकूचा आकार कमी झाला असून, रातांब्याच्या झाडांना अद्याप फुलोरा आलेला नाही.
रत्नागिरी : लांबलेला पाऊस, हवामानातील सातत्यपूर्ण बदल आणि ह्यक्यारह्ण तसेच ह्यमाहाह्ण वादळ यामुळे पिकांवर परिणाम झाला आहे. यावर्षीचा आंबा हंगाम नियमित हंगामापेक्षा उशिरा होणार आहे. काजूवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शिवाय वाल, कुळीथ, पावटा या पिकांची उत्पादकता घटली आहे. चिकूचा आकार कमी झाला असून, रातांब्याच्या झाडांना अद्याप फुलोरा आलेला नाही.
रत्नागिरीबरोबर कोकणची अर्थव्यवस्था अवलंबून असणाऱ्या आंबा पिकाचा हंगाम बदलत्या हवामानामुळे उशिरा होणार आहे. जानेवारीपासून थंडी सुरू झाल्याने फुलोरा उशिरा सुरू झाला, शिवाय फळधारणेचे प्रमाणही कमी आहे. ऑगस्टमध्ये आलेल्या मोहोराचे शेतकऱ्यांनी संरक्षण केल्याने आंबा बाजारात आला असला, तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
हवामानात होणाऱ्या सातत्यपूर्ण बदलामुळे कीड, बुरशी, थ्रीप्स, तुडतुडा, उंटअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा अंदाज घेत फवारणी करावी लागत आहे. सध्या वाटाणा ते सुपारी आकाराची फळे असली तरी आंबा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यातच बाजारात येण्याची शक्यता आहे. शिवाय थंडीचे प्रमाण वाढले तर मात्र फळधारणेला धोका पोहोचू शकतो. बदलत्या हवामानामुळे आंबा पिकाची उत्पादकता घटू लागली आहे.
लांबलेल्या पावसामुळे काजू कलमांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे फांदीमर रोगाची लागण होऊन बागांचे नुकसान होऊ लागले आहे. याशिवाय नवीन पालवीवर मॉस्क्युटो व फुलकिडी यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने नवीन पालवी वाळू लागली आहे. परिणामी यावर्षी काजूची उत्पादकता कमी असून, काजूबीच्या आकारावरही परिणाम झाला आहे.
पावसाळ्यातील भात कापणीनंतर कुळीथ, पावटा व वाल लागवड केली जाते. यावर्षी पाऊसच लांबल्याने कुळीथ, पावटा लागवड उशिरा करण्यात आली. नदीकाठच्या गावात वाल, कुळीथ लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. जमिनीतील ओलाव्यामुळे कुळीथ व पावट्याची रोपे तरारली आहेत. शाखा वाढल्या आहेत. परंतु उष्म्यामुळे पावट्याला फुले येत नसल्यामुळे शेंगा लागणे अशक्य आहे.
कुळीथही बहरला असला तरी त्यालाही शेंगा नाहीत. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी वेळेत लागवड केली, त्यांच्याकडील कुळीथ व पावटा पीक मात्र चांगले आहे. पावट्याच्या पानांवर किडीचा प्रादुर्भाव होऊन पाने पिवळी पडत आहेत. शिवाय उष्णता वाढल्याने फुले येत नाहीत, त्यामुळे शेंगा धरू शकत नसल्याने काही गावांतील शेतकऱ्यांनी पावट्याची रोपे काढून गुरांना घातली आहेत.
कोकणातील महत्वपूर्ण पिकाबरोबर चिकूचेही उत्पादन घेतले जात असले तरी याचे प्रमाण अल्प आहे. परंतु यावर्षी चिकूच्या उत्पादकतेवर परिणाम झाला असून, आकारही कमी झाला आहे. निसर्गातील बदलाचा खूप मोठा परिणाम कोकणातील सर्वच पिकांच्या उत्पादकतेवर झाला आहे.
यावर्षी पाऊस लांबल्यामुळेच जिल्ह्यातील पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. आंबा, काजू, रातांब्याला फुलोरा उशिरा असल्याने नियोजित हंगामापेक्षा हंगाम उशिरा सुरू होणार हे निश्चित असले तरी कीड, रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पावटा, कुळीथाची रोपे बहरली असली तरी त्यावर शेंगा नाहीत, पानावर किडीचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे यावर्षी कुळीथ, पावट्याची उत्पादकता घटली आहे. चिकूच्या आकारातही यावर्षी बदल झाला असून तो कमी झाला आहे.
- चंद्रकांत खानविलकर,
शेतकरी, उक्षी, ता. रत्नागिरी.
कोकणातील महत्वपूर्ण पीक म्हणजे कोकम. रातांब्याच्या फळांवर प्रक्रिया करून आमसुले, आगळ, सरबत, बियांपासून तेल तयार केले जाते. जानेवारीपासून रातांब्याच्या झाडाला फुलोरा येण्यास प्रारंभ होतो. मात्र, यावर्षी लांबलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा टिकून राहिला असल्याने अद्याप फुलोरा नाही.