रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचे गड, किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी राजा शिवछत्रपती परिवाराने पाऊल उचलले आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या सहाशे परिवाराच्या सदस्यांनी रत्नागिरी तालुक्यातील किल्ले जयगडची साफसफाई केली.छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड, किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे. बुरुज, तटबंदी ढासळत आहेत त्यांचे जतन करणे आणि ही संपत्ती पुढच्या पिढीला सुपूर्द करणे गरजेचे आहे. यासाठी स्थापन झालेल्या राजा शिवछत्रपती परिवाराचे सदस्य राज्यभरात या संवर्धनाचे काम करीत आहेत.या परिवाराचे सदस्य रत्नागिरीत दाखल झाले होते. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून परिवाराची जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर श्रीदेव भैरी बुवांच्या मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार सेनानी मायाजी भाटकर उर्फ मायनाक भंडारी यांच्या भाट्ये येथील समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण जयगड किल्ल्यावर गेले होते.राजा शिवछत्रपती परिवाराकडून किल्ले जयगड येथील संपूर्ण परिसर बालेकिल्ला, खंदकाची सफाई, तटबंदिवरची झुडपे, परकोटाची सफाई, बुरूज सफाई व इतर परिसर स्वच्छ करण्यात आला, अशी माहिती रत्नागिरी परिवाराचे उपेंद्र नागवेकर यांनी दिली.