मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने, शिवशाही बसेससाठी प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत ५५ शिवशाही गाड्या मुंबई, पुणे मार्गावर धावत होत्या. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून प्रवासी संख्या घटल्यामुळे बसेसची संख्या कमी झाली आहे. सध्या ३५ शिवशाही गाड्या दररोज धावत आहेत.
वातानुकूलित तसेच आरामदायी सुविधा उपलब्ध असलेल्या शिवशाही बसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. सुरुवातीला खासगी कंपनीमार्फत शिवशाही बसेस चालविण्यात येत असताना प्रचंड तक्रारी होत्या. मात्र आता महामंडळातर्फेच शिवशाही बसेस चालविण्यात येत असल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. शिवाय ऑनलाईन आरक्षण सुविधा उपलब्ध असल्याने येता-जातानाचे आरक्षण उपलब्ध होत आहे. खासगी वाहतुकीप्रमाणे गर्दीच्या वा गर्दी नसलेल्या हंगामात तिकीट दरांत चढउतार होत नाहीत. दर स्थिर असल्याने प्रवाशांकडून ‘शिवशाही’साठी पसंती दर्शविली जात आहे. परंतु गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रवासी वातानुकूलित गाडीतून प्रवास टाळू लागल्याने गर्दी ओसरली आहे.
पुणे मार्गावर १५, तर मुंबईसाठी २० गाड्या
सध्या पुणे मार्गावर १५, तर मुंबई मार्गावर २० शिवशाही बसेस सोडण्यात येत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे वातानुकूलित गाड्यांतून प्रवास टाळू लागल्याने प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळेच मुंबई-पुणे मार्गावरील २० गाड्यांची संख्या कमी झाली आहे.
उत्पन्नात चढ-उतार कायम
नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत ५५ गाड्या दररोज सोडण्यात आल्या; मात्र उत्पन्नातील चढ-उतार सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये पाच लाख ३३ हजार, डिसेंबरमध्ये ५ लाख ३८ हजार, जानेवारीत सात लाख ८२ हजार, तर फेब्रुवारीत पाच लाख दहा हजार रुपये उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त झाले होते.
शिवशाही सुरू झाल्यापासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यातील अनेक मंडळी मुंबई-पुणे येथे नोकरी, व्यवसायासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे या गाड्यांसाठी प्रवाशांचा ओघ कायम आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. वातानुकूलित वाहनातून प्रवास करणे टाळू लागल्याने प्रवाशांची संख्या कमी झाल्याने दैनंदिन नियोजनातील २० गाड्या कमी करण्यात आल्या आहेत.
- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
प्रतिसादानंतर निर्णय
प्रवाशांमध्ये एस.टी.बद्दलची विश्वासार्हता कायम आहे. त्यामुळेच ‘शिवशाही’साठी प्रवाशांनी पसंती दर्शविली आहे. वातानुकूलित, आरामदायी प्रवासासाठी शिवशाहीची निवड केली जाते. स्लिपर कोच शिवशाहीलाही वाढती पसंती आहे. मात्र प्रवाशांमध्ये कोरोनाची भीती असल्याने वातानुकूलित बसचा प्रतिसाद कमी झाला आहे. प्रतिसादाअभावीच दैनंदिन ५५ गाड्यांपैकी २० गाड्या कमी असून ३५ गाड्या सोडण्यात येत आहेत. भविष्यातही प्रवासी प्रतिसादानंतरच शिवशाही गाड्यांची संख्या कमी-अधिक करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. गेल्या चार महिन्यात जानेवारीत ‘शिवशाही’ला चांगला प्रतिसाद लाभला; मात्र मार्चमध्ये प्रवासी संख्या घटल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे.