गाळ उपसा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:29 AM2021-04-06T04:29:34+5:302021-04-06T04:29:34+5:30
कचऱ्यामुळे दुर्गंधी रत्नागिरी : शहरासह विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीत कचरा संकलनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची वाहने फिरत असतानादेखील काही नागरिक रस्त्यावरच ...
कचऱ्यामुळे दुर्गंधी
रत्नागिरी : शहरासह विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीत कचरा संकलनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची वाहने फिरत असतानादेखील काही नागरिक रस्त्यावरच कचरा फेकत आहेत. अनेक ठिकाणी कचरा न टाकण्याचे बोर्ड लावूनसुद्धा त्या ठिकाणी कचरा फेकून दुर्गंधी पसरवित आहेत.
महिला उद्योजकांचा सत्कार
दापोली : येथील जेसीआय संस्थेतर्फे शहरातील व्यावसायिक क्षेत्रामध्ये यशस्वी उद्योजिका म्हणून काम करणाऱ्या मात्र आजपर्यंत कधीही प्रकाशझोतात न आलेल्या महिला व्यावसायिकांचा सन्मान करण्यात आला. आकांक्षा जाधव, सुप्रिया सकपाळ, नूतन वैद्य, मुग्धा धारप, शामल जालगावकर, दीपिका करमरकर आदींना गौरविण्यात आले.
आरोग्य सुपीकता फलक
रत्नागिरी : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत प्रत्येक महसुली गावात आरोग्य सुपीकता निर्देशांक खत मात्रा फलक लावण्याची सूचना तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी केली आहे. ग्रामपंचायतीला पत्रके देऊन निर्देशांक फलक तयार करण्याची कारवाई सुरु झाली आहे.
वातावरणात बदल
रत्नागिरी : तापमानातील बदलामुळे दिवसा उकाडा तर रात्री गारवा जाणवत आहे. दिवसा ३६ अंश सेल्सिअसवर तापमान पोहोचत असून सायंकाळी मात्र घट होऊन २५ ते २६ अंशावर पारा येऊन ठेपत आहे. उकाडा आणि थंडी या विषम तापमानामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
मानधनापासून वंचित
रत्नागिरी : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सेवा बजावणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांना मानधनच मिळालेले नाही. शासनाच्या सर्व खात्यांतील कर्मचाऱ्यांचे वेतन होत आहे. गृहरक्षक दलाच्या जवानांमधील पॅड कर्मचाऱ्यांचे पगारही होत आहेत. मात्र, मानसेवी गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्ड) मात्र मानधनापासून वंचित असून त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे.
माकडांचा उपद्रव
रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी परिसरात माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भाजीपाला, पिके तसेच काजू, आंबा, नारळ बागांमध्ये शिरुन तयार फळांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे सातत्याने पहारा ठेवावा लागत आहे. वन विभागाकडून कारवाईची मागणी होत आहे.
खड्डे बुजविण्याची मागणी
रत्नागिरी : शहरातील रामआळी परिसरातील खड्डे न बुजविल्यामुळे श्री भैरीच्या पालखीला खड्डेमय रस्त्यातूनच न्यावे लागले. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वर्दळीच्या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
माठ विक्रीला
रत्नागिरी : गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ विक्रीला आले आहेत. २५० ते ५०० रुपयांपर्यंत माठांच्या किमती सांगण्यात येत आहेत. काळ्या तसेच तांबड्या मातीचे माठ विक्रीसाठी उपलब्ध असून नळ असलेल्या माठांना विशेष मागणी होत आहे.
काजू बीच्या दरात घसरण
रत्नागिरी : काजू बी आवक बाजारात सुरू झाली आहे. १३० रुपयांपर्यंत असलेला काजूचा दर घसरला असून ११० ते ११५ रुपये दराने खरेदी सुरू आहे. यावर्षी उत्पादन कमी असताना दरही कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.