रत्नागिरी : मी काेणतीही चूक केलेली नाही. मी दाेषी नाही त्यामुळे निश्चिंत आहे. प्रत्येक गाेष्टीला सामाेरे जाण्याची हिंमत परमेश्वराने दिलेली आहे. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक केले तरी चालेल मी घाबरत नाही, अशी स्पष्ट भूमिका राजापूरचे आमदार तथा ठाकरे सेनेचे उपनेते राजन साळवी यांनी प्रसार माध्यमांशी बाेलताना मांडली.लाचलुचत प्रतिबंध विभागाने गुरुवारी सकाळी आमदार राजन साळवी यांच्यावर कारवाई करत त्यांच्या घराची व हाॅटेलची झाडाझडती सुरु केली. त्यांच्यावर रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आमदार साळवी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले की, लाचलुचपत प्रतिबंध विभागाची पहिली नाेटीस आली तेव्हापासून मी चाैकशीला सामाेरे जात आहे. त्यांना जी माहिती पाहिजे ती प्रामाणिकपणे देण्याचा मी प्रयत्न केला आहे. मी काही दिवसांपूर्वी सांगून आलाे हाेती की, आता आलाे ते शेवटचा आलाे. यापुढे तुमची नाेटीस आली, निराेप आला तरी मी येणार नाही. त्याचदिवशी वाटले हाेते की, ही लाेक माझ्यापर्यंत पाेहाेचतील. दाेन दिवसापासून ही मंडळी रत्नागिरीत आहेत. रत्नागिरीतील एका हाॅटेलमध्ये ते उतरले आहेत. ते माझ्या घरापर्यंत येणार हे माहित हाेते तशी माझी मानसिकता हाेती, असे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, सत्ता आहे त्यामुळे सत्तेच्या अनुषंगाने आम्हाला त्रास देणे करु शकतात. पण मी निर्दाेष आहे. मी काय आहे हे मला स्वत:ला माहिती आहे, कुटुंबाला, लाेकांना आणि पक्षाला माहिती आहे. त्यामुळे मी कशालाही घाबरत नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी जे पैसे सांगितले, दाखवलेले ते मला कुठले ते माहिती नाही. उलट आमच्यावर जे कर्ज आहे ते ही त्यांनी दाखवावं, असेही ते म्हणाले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मी लाडका सैनिक हाेताे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत सैनिक आहे. माझ्या पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा पक्षावर विश्वास आहे. त्यामुळे माझ्या पाठिशी जनता व पक्ष आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन करून धीर दिला असून, संपूर्ण राज्याची शिवसेना आपल्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले.
..त्यामुळे अटक केली तरी घाबरत नाही, आमदार राजन साळवींची स्पष्ट भूमिका
By मनोज मुळ्ये | Published: January 18, 2024 4:34 PM