रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांचे रुप आता पालटणार आहे. सध्या वापरात असलेल्या या गाड्यांची जागा नव्या एलएचबी (लिके होल्फमन बुश) गाड्या घेणार आहेत. येत्या मे महिन्याच्या अखेरीस या गाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावतील, अशी शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. या गाड्यांचा वेगही आता १०० किलोमीटरवरून १३० किलोमीटरपर्यंत वाढणार आहे.नव्या गाड्यांचा रंग लाल-करडा असेल. डब्यांची लांबी आणि रुंदी वाढविण्यात आली असून, मोठे प्रवेशद्वार, आधुनिक बेसिन आणि शौचालये अशा सुविधा त्यात अंतर्भूत असणार आहेत. कपुरथळा (पंजाब) येथील रेल कोच फॅक्टरीत लिके होल्फमन बुश हे आधुनिक डबे बनविण्यात येत आहेत.
भविष्यात संपूर्ण देशात एलएचबी प्रकारातील डबे वापरण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली. डब्यांची लांबी आणि रुंदी वाढल्याने प्रवाशांना गाडीतून फिरण्यास जास्त जागा मिळणार आहे. बेसिन, टॉयलेटच्या रचनेतही बदल करण्यात आले आहेत. दरवाजातील जुनी चिंचोळी जागा वाढविण्यात आलेली आहे. त्यामुळे चढताना व उतरताना प्रवाशांना धक्काबुक्की, गर्दीला सामोरे जावे लागणार नाही.नव्या गाडीमध्ये प्रवासी क्षमता वाढणार आहे. शयनयान (स्लीपर कोच) डब्यात ७२ ऐवजी ८० प्रवासी झोपू शकतील, अशी व्यवस्था आहे. एसी ३ टायर (बी १ ते बी ५) मध्ये ६४ ऐवजी ७२ प्रवासी, एसी २ टायरमध्ये ५४ आणि एचए १ मध्ये २४ प्रवासी क्षमता आहे. त्यामुळे कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये एकूण १२४ प्रवासी क्षमता आणि मांडवी एक्स्प्रेसमध्ये ९४ प्रवासी क्षमता वाढली आहे. स्लीपर कोचमध्ये लोअर बर्थची रुंदी वाढण्याने ज्येष्ठ नागरिकांना झोपण्यास जादा जागा मिळणार आहे.कोचची बांधणी अॅल्युमिनिअम धातूनेकोकणकन्या व मांडवी एक्सप्रेस या गाड्यांचे रूप नेमके कसे असेल, याबाबत प्रवाशांमध्येही उत्सुकता आहे. एलएचबी कोचची बांधणी बाहेरून स्टील आणि आतून अॅॅल्युमिनिअम धातूने करण्यात आली आहे. परिणामी गाडीचे वजन कमी होऊन गाडीचा वेग १०० किलोमीटरवरून १३० किलोमीटरपर्यंत वाढणार आहे. या गाड्यांचे एलएचबी डबे अँटी टेलिस्कोपिक पद्धतीचे असून, त्यांचे वजन साधारण ३९.५ टन इतके आहे. त्यामुळे अपघाताच्या वेळी हे डबे उलटण्याची शक्यता कमी आहे.