रत्नागिरी : अंतर्गत मूल्यमापनामुळे दहावीचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. साईटीनंतरच अकरावीचे प्रवेश सुरू होणार आहेत. मात्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.
आयटीआय प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा न घेता, संबंधित मंडळांनी दिलेल्या दहावीच्या गुणपत्रिकेतील गुण आणि प्रवेश नियमावलीनुसार निर्धारित गुणाधिक्य याआधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करुन निर्धारित प्रवेश नियमावली व पध्दतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संचालनालयाच्या https://admission.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे.
प्रवेश अर्ज भरताना आधी मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. एका मोबाईल क्रमांकावर एकच प्रवेश दिला जाणार आहे. आयटीआय संस्थेत प्रवेश अर्ज भरताना उमेदवारांनी त्यांचा दहावी परीक्षेचा बैठक क्रमांक नमूद केल्यास त्यांची वैयक्तिक व दहावीच्या परीक्षेतील गुण याबाबत सर्व माहिती प्रवेश अर्जात देणे गरजेचे आहे. आयटीआय संस्थांमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश देण्यात येत आहे.