चिपळूणच्या प्रांताधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाचा राज्यस्तरीय पुरस्कार
By संदीप बांद्रे | Published: January 22, 2024 05:45 PM2024-01-22T17:45:56+5:302024-01-22T17:47:10+5:30
चिपळूण : येथील प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना निवडणूक आयोगाचा राज्यस्तरीय उकृष्ठ मतदार नोंदणी पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. चिपळूण ...
चिपळूण : येथील प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना निवडणूक आयोगाचा राज्यस्तरीय उकृष्ठ मतदार नोंदणी पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. चिपळूण विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणीसाठी सातत्याने केलेल्या कामांची दखल घेत प्रांताधिकारी लिगाडे यांना कोकण विभागातील ७५ विधानसभा मतदार संघातून राज्यस्तरीय उकृष्ठ नोंदणी पुरस्कारासाठी निवड केली आहे.
राज्यात २०२३-२४ मध्ये वर्षभराच्या कालावधीत निवडणूक विषय संदर्भात केलेल्या उल्लेखनिय व नाविन्यपुर्ण कामगिरीच्या आधारे निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार निमीत्त पारितोषीक व सत्कार वितरणातील विभागनिहाय विविध अधिकाऱ्यांची निवड केली आहे. यामध्ये चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांची उकृष्ठ मतदार नोंदणी पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
प्रांताधिकाऱ्या लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३३६ बीएलओ व अधिकाऱ्यांनी मतदान नोंदणीचे काम केले. चिपळूण मतदार संघात जवळपास २ लाख ८९ हजार मतदार होते. मात्र यामध्ये मयत झालेल्या मतदारांची संख्याही मोठी होती. तसेच गाव सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित झालेल्या मतदारांचाही समावेश होता. मतदार यादी अद्यावत करण्यासाठी बीएलओंच्या माध्यमातून घरोघरी भेटी देऊन त्याचे सर्व्हेक्षण करण्यात आले.
या सर्व्हेक्षणात मतदारांची परिपुर्ण माहिती घेत मयत झालेल्या तसेच स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली. याशिवाय ज्यांनी मतदार नोंदणी केलेली नाही, अशांची नोंदणी करण्यात आली. मतदार नोंदणी वाढण्यासाठी मतदार संघातील महाविद्यालयांमध्ये जनजागृती शिबीरे घेण्यात आली. कातकरी समाजासाठी स्वतंत्र त्यांच्या वस्तीत शिबीरे घेत मतदार नोंदणी करण्यात आली.
विविध मंडळाशी संपर्क साधून जागृती करण्यात आली. याचा परिपाक म्हणून ९ ते १० हजार मतदारांची नोंदणी वाढण्यास मदत झाली. यात सहभागी असलेल्या सर्वानी चोख कामगिरी बजावल्याने अद्यावत मतदार यादी होण्यास मदत झाली. निवडणूका जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्षात मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर आपला भर असल्याचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी स्पष्ट केले.