संदीप बांद्रेचिपळूण : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत प्राप्त झालेल्या साडेतीन कोटी रुपये निधीमधून चिपळूण नगर परिषदेने येथील कचरा प्रकल्पावर अत्याधुनिक बायोमेट्रिक हाती घेतला असून, या महत्त्कांक्षी प्रकल्पाचे काम आता प्रगतिपथावर आले आहे. कचरा वर्गीकरण, विघटन आणि रासायनिक प्रक्रिया करून व भविष्यात बायोगॅसद्वारे वीजनिर्मिती करणारा हा कोकणातील मोठा प्रकल्प ठरणार आहे.स्वच्छ भारत अभियानात भाग घेऊन चिपळूण नगर परिषदेने उत्तम कामासाठी शासनाचा पुरस्कारही मिळवला आहे. या अभियानात नगर परिषदेला ३ कोटी ४६ लाख ९५ हजार ६६८ इतका निधी शासनाकडून मिळाला होता. या निधीमधून चिपळूण परिषदेने १२ वाहने खरेदी केली होती. उर्वरित निधीमधून अत्याधुनिक असा बायोमेट्रिक व बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला व त्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.चिपळूण शहरातील शिवाजीनगर येथील डोंगरावर ६ एकर जमिनीत असलेल्या कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी हा अत्याधुनिक प्रकल्प उभारला जात असून बायोमेट्रिक प्रकल्पाची क्षमता २२ टन कँपोस्टिंगची असून बायोगॅस प्रकल्पाची क्षमता ५ टन कँपोस्टिंग इतकी असेल. ओला कचरा, सुका कचरा आणि प्लास्टिक असे वर्गीकरण करून त्याचे विघटन व त्यापासून बायोगॅस निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी ८२ लाख ७५ हजार ७४७ रकमेची अत्याधुनिक यंत्रसामग्री येथे आणण्यात आली असून दोन वेगवेगळ्या इमारतीही उभारण्यात आल्या आहेत.३० मार्च २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा असल्याने प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू ठेवण्यात आले आहे. तज्ज्ञ मंडळींसह मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे तसेच आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. १ मार्च २०२३ ला स्वच्छ भारत अभियान २ सुरू होणार असून त्या माध्यमातूनही नगर परिषदेने तयारी केली आहे. बायोगॅस प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यावर वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे चिपळूण नगर परिषद प्रकल्पासाठी विजेबाबत स्वयंपूर्ण होणार आहे.नगर परिषदेने हाती घेतलेला हा प्रकल्प कोकणातील एक मोठा बायोमेट्रिक, बायोगॅस प्रकल्प ठरणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक ठेकेदारच या प्रकल्पाचे काम करत असून अत्याधुनिक यंत्रसामग्रीसाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची मदत घेतली जात आहे. दिलेल्या वेळेत काम पूर्ण व्हावे, याकडे सर्व यंत्रणा लक्ष देऊन आहे आणि त्याचा वेळोवेळी आढावाही घेतला जात आहे.
चिपळूण नगर परिषदेचा अत्याधुनिक बायोमेट्रिक प्रकल्प प्रगतिपथावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 6:10 PM