रत्नागिरी : केंद्रातील भाजप सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीची स्वबळावर तयारी करण्याकरिता भाजपने समर्थ बूथ अभियान सुरू केले. रत्नागिरी जिल्ह्यात ८५३ पैकी ६८८ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९१६ पैकी ९१२ बूथप्रमुख व समित्या नेमण्यात आल्या आहेत. या सर्व सदस्यांशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मंगळवारी ऑडिओ ब्रीजच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत, अशी माहिती समर्थ बूथ अभियानचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक अतुल काळसेकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत काळसेकर म्हणाले की, आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या महाराष्ट्रातील सर्व जागा स्वबळावर लढवून जिंकण्यासाठी भाजपाने समर्थ बूथ अभियान सुरू केले आहे. ६ जुलै रोजी जनसंघाचे पहिले अध्यक्ष स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्मदिवसापासून हे अभियान सुरू झाले. १७ सप्टेंबर ला पंतप्रधान मोदी यांचा जन्मदिवशी त्याची सांगता होणार आहे. या अभियान समाप्ती दिवशी पंतप्रधान मोदी राज्यातील सुमारे ९३ हजार बूथ अध्यक्षांशी थेट संवाद साधणार आहेत.
बूथ समित्यांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे आणि केंद्र सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत घेअन जाणे हा मुख्य उद्देश असल्याचे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे रत्नागिरी शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार उपस्थित आदी होते.