व्यावसायिकांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:32 AM2021-04-20T04:32:21+5:302021-04-20T04:32:21+5:30
आंजर्लेतन एस. टी. बस सुरू दापोली : तालुक्यातील आंजर्ले गावातून एस. टी. जाण्यासाठी आंजर्लेचे दिव्यांग उपसरपंच मंगेश महाडिक यांनी ...
आंजर्लेतन एस. टी. बस सुरू
दापोली : तालुक्यातील आंजर्ले गावातून एस. टी. जाण्यासाठी आंजर्लेचे दिव्यांग उपसरपंच मंगेश महाडिक यांनी गेल्या आठवड्यात उपोषण केले होते. त्यांच्या उपोषणाला यश येऊन आंजर्ले गावातून एस. टी. सुरू करण्यात आली आहे. आंजर्ले केळशी मार्गावरील पाडले समुद्रकिनारी असलेल्या एकेठिकाणी रस्ता निसर्ग चक्रीवादळात खचला आहे. यामुळे गेल्या वर्षभरापासून या मार्गावरील एस. टी. सेवा बंद करण्यात आली होती. आता आंजर्ले गावात बससेवा सुरू करण्यात आली आहे.
गुहागरात मास्क वाटप
गुहागर : शहरातील बुद्धविहारामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील रहिवाशांना मास्क, फळे व रोगप्रतिकार गोळ्यांचे वितरण करण्यात आले. तालुका बौद्धजन सहकारी संघ विभाग क्र. १, शाखा क्र. ७ आणि आम्रपाली महिला मंडळ व नवतरुण बालमित्र कन्या विद्यार्थी नाट्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष राजेश बेंडल, मंडळाचे अध्यक्ष वैभव गमरे, उपाध्यक्ष भीमसेन सावंत उपस्थित होते.
२०० काजूची झाडे खाक
खेड : तालुक्यातील मौजे कुंभाड येथे लागलेल्या वणव्यात सदानंद लक्ष्मण भोसले यांच्या मालकीची २०० काजूची झाडे जळून खाक झाली. त्यांनी शासनाच्या योजनेंतर्गत ४०० काजूच्या झाडांची लागवड केली होती; मात्र अचानक लागलेल्या वणव्यात २०० हून अधिक झाडे जळून खाक होऊन मोठी हानी झाली आहे.
आंजर्लेत लसीकरण केंद्राची मागणी
दापोली : तालुक्यातील आंजर्ले हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे दापोली तालुकाध्यक्ष व आंजर्ले येथील रहिवासी मकरंद म्हादलेकर यांनी जिल्हा परिषद सदस्य व कृषी आणि पशुसंवर्धन समिती सभापती रेश्मा झगडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.