खेड : महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी १५ एप्रिलपासून राज्यभर कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनानंतर राज्यभरात ३ मे रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत भीक मांगो आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, जलसंधारण, जलसंपदा, नगरविकास विभागाकडील राज्यातील सर्व कंत्राटदारांची प्रलंबित देयके देण्यासाठीचा निधी शासनाने १५ एप्रिलपूर्वी वितरित करण्यात यावा, राज्यातील सर्व विभागांची नवीन प्रस्तावित कामे कंत्राटदारांची प्रलंबित देयके पूर्ण होईपर्यंत काढू नयेत, तसेच त्यांच्या निविदा प्रक्रिया अजिबात राबवू नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
सर्व विभागांच्या प्रस्तावित नवीन कामांना शासनाच्या अर्थ विभागाकडून ५० टक्के निधीची तरतूद केल्याशिवाय व मंजुरी मिळाल्याशिवाय पुढील कोणतीही निविदा प्रक्रिया सुरू करू नये, राज्यातील सर्व विभागाकडील कामे करण्यासाठी एकाच विभागाचे बांधकाम नोंदणीकरण प्रमाणपत्र आवश्यक व बंधनकारक करावे, १० लाखावरील सर्व कामांची ई-ऑनलाईन टेंडर नोटीस ही समप्रमाणात सर्व कंत्राटदारांसाठी विभागून करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या पाच मागण्यांची पूर्तता १४ एप्रिलपूर्वी करावी, अन्यथा राज्यभरातील सर्व विभागाकडील शासनाची कामे थांबवून १५ एप्रिलपासून राज्यभर काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे.