लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नेहमीच्या गाड्यांसह मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या ११२ गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने चाकरमान्यांचा पुन्हा हिरमोड झाला आहे. या गणपती स्पेशल गाड्यांची प्रतीक्षा यादी २७५वर पोहोचल्याने गाव गाठायचे कसे? या चिंतेत असणाऱ्या गणेशभक्तांची पावले एस. टी.च्या ग्रुप आरक्षणाकडे वळली आहेत. आत्तापर्यंत १६० बसफेऱ्यांचे ग्रुप आरक्षण झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
गतवर्षी कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे चाकरमान्यांची गणरायाच्या दर्शनाची संधी हुकली होती. यंदाही कोरोनाचे संकट कायम असले तरी रेल्वे प्रशासनाने गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा करत चाकरमान्यांना सुखद धक्के दिले. नियमित गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्यानंतर मध्य व कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या गणपती स्पेशलच्या ७२ फेऱ्यांमुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, या फेऱ्यांचे आरक्षण खुले होताच साऱ्यांची पावले आरक्षण खिडकीकडे वळली आणि काही तासातच या फेऱ्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने चाकरमान्यांच्या पदरी निराशा पडली होती. त्यानंतर चाकरमान्यांच्या नजरा विशेष गाड्यांकडे खिळल्या होत्या.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ४० गणपती स्पेशल चालविण्याचे संकेत दिल्याने चाकरमानी सुखावले होते. यातील १६ रेल्वेगाड्यांच्या ३२ फेऱ्या जाहीर करून गणेशभक्तांना पुन्हा सुखद धक्का दिला होता. ७ ऑगस्टपासून नव्याने जाहीर केलेल्या १६ गणपती स्पेशल गाड्यांच्या आरक्षणासाठी चाकरमान्यांची आरक्षण खिडक्यांवर गर्दी उसळली. मात्र, या गाड्यांची प्रतीक्षा यादीच वाढत गेल्याने प्रवाशांना तिकीट मिळू शकलेले नाही. त्यामुळे चाकरमान्यांनी आता एस. टी. बसचे बुकिंग करण्यास सुरूवात केली आहे.
----------------------
गाडी प्रतीक्षा यादी
एलटीटी - कुडाळ गणपती स्पेशल - १४५
एलटीटी - मडगाव गणपती स्पेशल - २७५
पनवेल - करमाळी स्पेशल - ११०