लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : महिला आणि पुरुष एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागले तरीही अजून महिला अत्याचाराच्या घटना समाजात घडत आहेत. शहरापेक्षा ग्रामीण भागात विवाहित महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रास अधिक होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
शिक्षणामुळे महिला स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर झाल्या आहेत. स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ लागल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव असल्याने लग्न झाल्यानंतर तिने नवरा किंवा सासरच्या लोकांच्या मनाप्रमाणे वागायचे, घरातील कामे करायची, कुठे जाताना परवानगी घेऊन जायचे, माहेरच्यांशी जास्त संपर्क ठेवायचा नाही, अशी अपेक्षा बाळगली जाते. काही वेळा मूल न होणे, मुलगी होणे, यावरूनही त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. शहरी भागात तर मोबाइलमुळे संशय निर्माण झाल्याने पत्नीला त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. बाहेर काम करणाऱ्या महिलांनाही यामुळे त्रास होण्याच्या घटना घडत आहेत.
पतीपत्नी यांच्यातील वादाचे मुख्य कारण सध्या मोबाइल हे होऊ लागले आहे. विश्वास कमी आणि संशय वाढत चालल्याने पत्नीला त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागात सुनेकडून शारीरिक कामाची अपेक्षा, बरीच वर्ष मूल न होणे, मुलगी होणे यामुळे नाराजी, काही वेळा माहेरहून काही आणत नाही, याबद्दल राग, त्यातच सून शिकलेली असेल तर ती विरोध करते, त्यामुळेही तिचा छळ होत आहे.
-ॲड. संध्या सुखटणकर, अध्यक्ष, तक्रार निवारण समिती
पन्नाशी ओलांडली तरी छळ सुरूच....
काही महिलांनी पन्नाशी ओलांडली तरीही तिला पती, भाऊ किंवा मुलांकडून अत्याचार सोसावा लागतो. मोबाइल, नोकरी, व्यवसायासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांचा छळ संशयामुळे केला जातो. त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळेही अनेक महिलांना शारीरिक तसेच मानसिक छळाला सामोरे जावे लागते. अशा महिलांना कौटुंबिक हिंसाचाराविरोधी कायद्याद्वारे संरक्षण अधिकारी यांच्यामार्फत न्याय मिळवून दिला जातो.
जिल्ह्यात अजूनही छुपा हिंसाचार सुरूच आहे. नवऱ्याने एकदाच मारलं ना, मग काय झालं. बायकांचा जन्म सहन करण्यासाठीच आहे, अशी मानसिकता अजूनही समाजातून किंवा अगदी माहेरच्या माणसांकडूनही त्या महिलेची केली जाते. त्यामुळे मारहाण होतेय ना, घरातच रहा, असं तिच्या मनावर बिंबवलं जातं. काही वेळा मुलं मोठी झाली तरीही महिलेला मारहाण होते.
- माधवी जाधव, संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास