रत्नागिरी : शहरातील कचरा संकलित केल्यानंतर तो साळवी स्टॉप येथे डंप केला जातो. गेली अनेक वर्षे कचरा साठलेला असल्यामुळे गॅस तयार होऊन आग लागते, धूर पसरतो. यावर मार्ग काढताना, अत्याधुनिक मशीनद्वारे कचऱ्यापासून खडी आणि खत निर्मिती केली जाणार आहे. येत्या दोन महिन्यात कचऱ्यापासून खडी, खत निर्मिती सुरू होईल, अशी माहिती नगराध्यक्ष प्रदीप साळवी व आरोग्य सभापती निमेश नायर यांनी दिली.रत्नागिरी नगर परिषदेचा साळवी स्टॉप येथे कचरा डेपो असून, दररोज शहरातून कचरा संकलित केल्यानंतर त्याठिकाणी २२ टन कचरा डंप करण्यात येतो. कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने तो साठून कुजला आहे. सध्या पाचशे टनापेक्षा अधिक कचरा साठला आहे.
पाच टनाचे एक युनिट उभारून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते, त्यातून खत निर्मिती होते. मात्र, त्यासाठी मर्यादा असल्याने वर्षानुवर्षे हा कचरा तसाच साठल्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. साठलेल्या कचऱ्यातून गॅस तयार होत असून अचानक आग लागते. परिणामी आग लागून धूर निर्माण होत असल्याने परिसरातील नागरिकांना याचा त्रास होतो. म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाने नगरपरिषदेला नोटीस बजावली होती.शहरातील वर्षानुवर्षे रखडलेला कचऱ्याचा प्रश्न येत्या दोन महिन्यात मार्गी लावण्यात येणार असून, त्यासाठी विविध कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. कचऱ्यावर प्रक्रिया अत्याधुनिक मशीनद्वारे करून ह्यखत आणि खडीह्ण निर्मिती करण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून तांत्रिक मान्यता घेण्यात आली आहे.
कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी शासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच अठरा लाखाची निविदा प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर महिनाभरात काम सुरू होणार आहे. येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे साठलेला कचरा नष्ट होऊन, साळवी स्टॉप येथील कचरा डेपो लवकरच रिकामे मैदान तयार होईल. कचऱ्यापासून खडी, खत निर्मिती प्रकल्पासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे सहकार्य लाभत आहे.- प्रदीप साळवी, नगराध्यक्ष