वादळाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास, सर्वाधिक नुकसान राजापूर तालुक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 11:17 AM2019-11-06T11:17:31+5:302019-11-06T11:19:36+5:30
अतिवृष्टीमुळे हातातून गेलेले पीक आता क्यार वादळाने पूर्णत: ओरबाडून नेले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर क्यार वादळाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावून घेतला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास गेल्यामुळे आता आपल्या कुटुंबाला व जनावरांना वर्षभर पोसायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे डोळ्यातील अश्रू पुसत सर्वसामान्य शेतकरी आपले जमीनदोस्त झालेले पीक गोळा करण्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत.
विनोद पवार
राजापूर : अतिवृष्टीमुळे हातातून गेलेले पीक आता क्यार वादळाने पूर्णत: ओरबाडून नेले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर क्यार वादळाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावून घेतला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास गेल्यामुळे आता आपल्या कुटुंबाला व जनावरांना वर्षभर पोसायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे डोळ्यातील अश्रू पुसत सर्वसामान्य शेतकरी आपले जमीनदोस्त झालेले पीक गोळा करण्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत.
राजापूर तालुक्यातील सुमारे ८५० हेक्टर क्षेत्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शासनाने सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून करण्यात येत आहे. तालुक्यातील सुमारे २३७ गावे अतिवृष्टी व क्यार वादळामुळे बाधित झाली असून, कृषी, महसूल व पंचायत समितीचे १०० पंचनामे करण्यात गुंतलेले आहेत. तालुक्यातील सुमारे ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित कामही युध्दपातळीवर सुरु आहे.
शेतात पाणीच पाणी
क्यार वादळ व लांबलेला परतीचा पाऊस यामुळे शेती मोठ्या प्रमाणावर जमीनदोस्त झाली असून, अनेक ठिकाणी अद्याप शेतात पाणीच पाणी आहे. त्यामुळे गुडघाभर चिखलात उभे राहून उभे पीक कापावे लागत आहे. हे कापलेले भात पुन्हा शेताच्या बाहेर काढून वाळत घालावे लागत आहे. परिणामी शेतकरीवर्गाची चांगलीच दमछाक होत आहे.
अनेक ठिकाणी आडवे झालेले भात पुन्हा रूजून आल्याने शेतकऱ्यांनी ते तसेच शेतात ठेवले आहे. तर भिजलेले भात पीठूळ होण्याची भीतीही शेतकरीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वर्षभर खायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
प्लास्टिकचा खर्च वाढला
परतीच्या पावसाने आठ दिवस संततधार लावल्याने पूर्ण तयार झालेले पीक कापून प्लास्टिकच्या कागदाखाली झाकून ठेवलेले दिसत असून, झोडणी झाल्यावरही ते प्लास्टिकवर उन्हात वाळत घालावे लागत आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना नाहक दुष्काळात तेरावा महिना असे म्हणत प्लास्टिक खरेदी करावे लागले आहे. आधीच शेतीवर केलेला खर्चही निघत नसताना हा प्लास्टिकचा अधिकचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
पीकपाण्याची नोंदच नाही
शासन नुकसानभरपाई देईल, या आशेवर असणाऱ्या राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारी बाबुंच्या अनागोंदी कारभाराचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये तलाठ्यानी सातबारा उताऱ्यावर पीकपाण्याची नोंदच घातली नसल्याने बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आई जेवू घालीना अन् बाप भीक मागू देईना, अशी अवस्था तालुक्यातील शेतकरीवर्गाची झाली आहे.
राहिलेल्या नोंदी लवकरात लवकर घालून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी, असे साकडे कुंभवडे येथील शेतकरी भाई सामंत यांनी पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व तहसीलदार प्रतिभा वराळे यांना घातले आहे.
अधिकारी शेतावर
राजापूर तालुक्यातील २३७ महसुली गावातील सुमारे ६२४० शेतकऱ्यांच्या ८५० हेक्टर जमीन क्षेत्रातील भात, नागली, आंबा, काजू व इतर पिकांचे परतीच्या पावसाने व वादळामुळे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांत प्रशासनाने मेहनत घेत आजपर्यंत सुमारे ५० टक्के पंचनामे पूर्ण केले आहेत. उर्वरित पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. सध्या सर्वच विभागातील अधिकारी शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करीत आहेत.
मच्छिमारांनाही क्यारचा फटका
क्यार वादळाचा फटका राजापूर तालुक्यातील मच्छिमारांनाही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला. तालुक्यातील नाटे, तुळसुंदे भागात अनेक मच्छिमार आहेत. साखरीनाटे व इतर भागातील लोकांना मासेमारी व्यवसायाशिवाय उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नाही. जमीनच नाही पर्यायाने त्यांना मासेमारीवरच गुजराण करावी लागते.
आधी अतिवृष्टी... आता क्यार
काहिशा उशिराने सुरु झालेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात जोरदार बरसायला सुरुवात केली होती. त्यामुळे तालुक्यातील अनेक भागातील शेती आठ दिवस पाण्याखाली गेली होती. पर्यायाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांचे क्यार वादळाने आणखीनच कंबरडे मोडले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे याआधीच झाले असले तरी त्याची कोणत्याही प्रकारची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे पूर्वी झालेल्या नुकसानाचे पंचनामे प्रशासनाकडून पुन्हा क्यारच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकच नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.