राजापूर : संततधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या अतिवृष्टीतील नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिले आहेत.
राजापूर शहर आणि तालुका परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसाचा फटका शहरासह ग्रामीण भागाला बसला आहे. अर्जुना आणि कोदवली नद्यांचा पूर ओसरला असला तरी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसाचा तडाखा तालुक्यातील ग्रामीण भागाला बसला असून, कुवेशी येथील जयवंत भट, अनिल बावकर यांच्या घराची पडझड झाली आहे तर कणेरी येथील ऋतिका राणे यांच्या घराची भिंत कोसळली आहे. अणुसुरे येथील सुनीता संजय पंगेरकर यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. मात्र, कोठेही जीवितहानी झालेली नाही. या अतिवृष्टीत झालेल्या घर, गोठे व अन्य मालमत्ता यांचे स्थानिक पातळीवर मंडल अधिकारी, तलाठी, कृषी विभाग यांना पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे तहसीलदार वराळे यांनी सांगितले.