रत्नागिरी : चिपळूण, खेडमध्ये महापुरामुळे चिखल, कचरा अशुद्ध पाणी, शहरात साचलेले कचऱ्याचे ढीग यामुळे रोगराईला निमंत्रण ठरलेले होते. तसेच कोरोनाचाही धोका होता. अशा आव्हानात्मक परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने नियोजनबद्ध काम केल्याने साथीच्या रोगांना अटकाव करण्यात यश मिळवले आहे.
महापुरामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २४ तास साथरोग व पूरनियंत्रण कक्ष कार्यरत केले आहेत. जिल्ह्यात ४७ गावांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची ६१ वैद्यकीय पथो, सुसज्ज रुग्णवाहिका, पुरेसा औषध साठ्यासह सज्ज ठेवला होता. खेडमधील विस्तापित १०८ कुटुंबे व ५७८ ग्रामस्थ आणि चिपळूण तालुक्यातील १६ कुटुंबे आणि ७४ ग्रामस्थ विस्थापित झाले होते. त्या ठिकाणी आरोग्य पथकाद्वारे आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
२० वैद्यकीय पथके चिपळूणात, १४ ग्रामीण भागात आणि ४ फिरते आरोग्य पथके आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने सर्व त्या आरोग्य पुरविण्यामध्ये कार्यरत आहेत. ४ आरबीएसके पथकातील ७ डॉक्टर्स, ४ एएनएम आणि ४ औषध निर्माण अधिकारी हे वाहनांसह तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले होते. खेड शहरात ५ वैद्यकीय पथके, ग्रामीण भागात ३ वैद्यकीय पथके, संगमेश्वरात १३, रत्नागिरीत ६, लांजात १ आणि राजापुरात ९ वैद्यकीय पथके आपत्ती निवारण्याच्या अनुषंगाने सर्व त्या आरोग्य सेवा पुरविण्यासाठी अजूनही कार्यरत आहेत.
नऊ रुग्णवाहिका चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून पुरेसा औषध साठा देण्यात आला. आरोग्य पथकांमध्ये पुरेसा औषधसाठा, मेडिक्लोर, सर्पदंश लस, ओआरएस उपलब्ध ठेवण्यात आले. अतिरिक्त औषधांची मागणी गरजेनुसार करण्यात आली. पूर ओसरल्यानंतर प्रत्येक गावात आरोग्य सेवक व आरोग्यसेविका यांच्यामार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये २९ हजाराहून अधिक घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. पिण्याच्या पाण्यासाठी विहीर, बोअरवेल आदींचे शुद्धीकरण करण्यात आले. तसेच किटकजन्य, जलजन्य आजारांच्या अनुषंगाने सर्व्हेक्षण करण्यात आले.
-----------------------------
पूर परिस्थिती ओसरल्यानंतर योग्यवेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने उद्रेकजन्य स्थिती चिपळूण, खेड परिसरात उद्भवली नाही. काही ठिकाणी तापाचे किरकोळ रुग्ण आढळले. त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. पुरामुळे साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. मात्र, आराेग्य यंत्रणेने केलेल्या कामामुळे साथरोग उद्रेक झाला नाही. पूरग्रस्त भागात ४,४२० घरांमध्ये औषध फवारणी करण्यात आली.