मंंडणगड : मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात डॉ. तानाजीराव चोरगे महाविद्यालयाने उल्लेखनीय यश मिळविले. ऑनलाईन ऑन द स्पॉट पेंटींग आणि पोस्टर मेकिंग स्पर्धेत या महाविद्यालयाच्या अनुराधा टिकुटे हिने दोन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तसेच पोस्टर मेकिंग स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
जनता कर्फ्यूचा धसका
रत्नागिरी : येत्या शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. हा कर्फ्यू पुढे वाढणार की काय ही भीती नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. त्यामुळे आतापासूनच सर्व वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.
डांबरीकरणाला शुभारंभ
लांजा : तालुक्यातील तळवडे येथील तळवडे फाटा ते आडवली रेल्वेस्टेशन रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २० लाख रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण होणार आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ करण्यात आला.
व्यापारी नाराज
देवरुख : शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर केल्याने पुन्हा एकदा व्यापाऱ्यांवर संकट आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्व दुकाने नियमित होत असतानाच पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाल्याने धंदा कसा करायचा अशी चिंता व्यापाऱ्यांना सतावू लागली आहे.
डिजिटल ७/१२ डोकेदुखी
दापोली : शासनाने डिजिटल ७/१२ उपलब्ध करून दिला आहे. मात्र, काही ठिकाणी शेतकऱ्यांना डोकेदुखी होऊ लागली आहे. ७/१२ डिजिटलायझेशनमध्ये अनेक चुका असल्याने सहकारी संस्थांमधून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत.
ऑनलाईन साहित्य संमेलन
चिपळूण : शिक्षक साहित्य कला-क्रीडा मंडळाच्यावतीने ११ व १२ एप्रिल रोजी ऑनलाईन साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. यानिमित्त चित्र, शिल्प प्रदर्शन, सांस्कृतिक आदी कार्यक्रम होणार आहेत. यावेळी प्रत्येक जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा गौरव होणार आहे.
गांधीधाम एक्स्प्रेस धावणार
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून गांधीधाम नागरकोईल ही रेल्वे सध्या बंद होती. मात्र, येत्या २७ एप्रिल ते ८ जून या कालावधीत ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. ही गाडी पूर्णत: आरक्षित राहणार आहे. शासनाच्या कोरोना संबंधीच्या नियमांचे पालन करून ही गाडी सुरू होणार आहे.
पालक धास्तावले
खेड : दुसऱ्या लाटेतील कोरोनाचे रुग्ण तरुण वर्गातील असल्याने सध्या पालकांमधून चिंता व्यक्त होत आहे. तसेच या लाटेतील कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरू लागला असल्याने पालक मुलांना घराबाहेर पाठविण्यास घाबरत आहेत. सध्या सापडू लागलेल्या रुग्णांमध्ये १४ वर्षीय मुलांचा समावेश आहे.
लसीकरणासाठी घाई
रत्नागिरी : लसीकरणाचा साठा संपत आल्याने आता ज्या नागरिकांनी अद्याप लसीकरण करून घेतलेले नाही असे आता लसीकरणासाठी घाई करून लागले आहेत. शासनाने ४५ वर्षांवरील सरसकट व्यक्तींना लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. मात्र, सध्या लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे.
उपस्थिती अनिवार्य
रत्नागिरी : सध्या शासनाने विविध शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. कोरोनाचा संसर्ग थोपविण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असला तरी काही ठिकाणी अजूनही मार्च एण्डींगची कामे खोळंबलेली आहेत. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित रहावे लागत आहे.